महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

राज्यात मुस्लिम आरक्षणासाठी 'एनडीए'च्या घटक पक्षांकडून वाढला जोर; भाजपाचा थेट विरोध? - Muslim Reservation

Muslim Reservation: मुस्लिम आरक्षणाच्या (Muslim Reservation) मागणीवरून आता महायुतीतील घटक पक्ष आग्रही होताना दिसत आहेत. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी विधानसभेत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून केली जाणार आहे. यामुळं मुस्लिम आरक्षणाला विरोध असलेल्या भारतीय जनता पक्षाची गोची होणार असून भारतीय जनता पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं भाजपाच्या वतीनं सांगण्यात आलय.

Muslim Reservation
मुस्लिम आरक्षण (ETV BHARAT MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 6:41 PM IST

Updated : Jun 13, 2024, 9:58 PM IST

मुंबई Muslim Reservation : राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सातत्यानं पेटलेला असताना आता त्यात मुस्लिम आरक्षणाची भर पडणार आहे. राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी, सत्ताधारी पक्षातीलच नेत्यांकडून केली जात आहे. आंध्र प्रदेश सरकारनं आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण लागू केलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेली तेलगु देशम पार्टी ही एनडीएचा घटक पक्ष झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या धर्माच्या आधारावरील आरक्षणाला विरोध असतानाही आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिमांना आरक्षण लागूच राहील, अशी ठाम भूमिका टीडीपीनं घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मते महायुतीपासून विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापासून दुरावल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातही मुस्लिम आरक्षणाची मागणी एनडीएच्या घटक पक्षांकडून जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (ETV BHARAT Reporter)


आरक्षणाचा प्रस्ताव आणा अन्यथा मला मोकळ करा : मुस्लिम आरक्षणासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार हे अत्यंत आग्रही आहेत. राज्यातील अन्य समाजातील नागरिकांना ज्याप्रमाणे आरक्षणाचा अधिकार आहे. त्याप्रमाणं मुस्लिम समाजातील गरीब आणि वंचित तसंच मागास जातींना आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आपली ठाम भूमिका आहे. येत्या अधिवेशनात याबाबत प्रस्ताव सभागृहात मांडला गेला पाहिजे, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडं मागणी करत आहोत. जर मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत आणता येणार नसेल तर मग मला पदाच्या जबाबदारीतून मोकळं करा, असंही आपण स्पष्ट केलं आहे, असं मंत्री सत्तार यांनी सांगितलय.



अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला पाहिजे :एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनंही मुस्लिम आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुस्लिम समाजातील मागास आणि गरीब लोकांवर अन्याय होत आहे. त्यांच्या विविध समस्यांना सोडवलं गेलं पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं नुकतीच अल्पसंख्याक सेलची एक बैठक घेतली. या बैठकीनंतर मुस्लिम आरक्षणासंदर्भात लवकरच विधानसभेत चर्चा करण्याचा निर्णयही घेतला गेला आहे. त्यामुळं याबाबत येत्या अधिवेशनात चर्चा होईल असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं.



भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम : यासंदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते डॉ. शिवराय कुलकर्णी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे आरक्षण दिले आहे. ते आरक्षण हिंदू धर्मातील ज्या जाती मागास होत्या त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना समान संधी देण्यासाठी आरक्षणाची तजवीज करण्यात आलीय. यामध्ये धर्माचा विषय येतोच कुठे? त्यामुळं धार्मिक आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही, ही आमची भूमिका कायम आहे. या संदर्भात जरी भविष्यात आमच्या सहयोगी पक्षांनी वेगळी भूमिका मांडली आणि मुस्लिम आरक्षणाची मागणी केली तरीसुद्धा आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत. धर्माच्या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही ही आमची भूमिका कायम असेल असं कुलकर्णी यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. माझं कुटुंब उद्याला जिवंत नसलं तरी मी बाजूला हटणार नाही- मनोज जरांगे पाटील
  2. तर विधानसभा लढविणारच, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
  3. "मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांना विरोध करणाऱ्यांना असं पाडा की...", मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन
Last Updated : Jun 13, 2024, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details