हैदराबाद Delimitation Effects :मोदी सरकारनं त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशची विशेष काळजी घेतल्याचं पाहायला मिळालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या राज्याला वेगवेगळ्या योजनांतर्गत हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. अमरावतीच्या विकासासाठी केंद्रानं 15,000 कोटींची तरतूद केली. राज्याच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी महत्त्वाचा असलेला पोलावरम प्रकल्प पूर्ण करण्यावरही अर्थसंकल्पात भर देण्यात आला.
विशाखापट्टणम-चेन्नई औद्योगिक कॉरिडॉर आणि हैदराबाद-बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरवर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील मागास भागांच्या विकासासाठी विशिष्ट अनुदान जाहीर करण्यात आलं. याव्यतिरिक्त, आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 अंतर्गत आर्थिक वाढीसाठी भांडवली गुंतवणुकीसाठी अतिरिक्त निधीसह आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं आहे.
भाजपाचा मित्रपक्ष तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल (युनायटेड) एनडीए पक्ष सरकारचा अविभाज्य भाग आहे. एनडीएच्या स्थिरतेसाठी आणि केंद्र सरकारमध्ये बहुमत टिकवण्यासाठी टीडीपी आणि संयुक्त जनतादल या दोन्ही पक्षांचा पाठिंबा आवश्यक होता. बिहारसाठीही मोठ्या घोषणा या अर्थ संकल्पात करण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये नवीन विमानतळ, क्रीडांगण, रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय कौशल्य विकास केंद्र बिहारमध्ये उभारले जाणार आहे. बिहारमधील रस्त्यांसाठी 26 हजार करोड रूपये दिले जाणार आहेत. आता ही विशेष मदत मिळाली असली तरी मतदारसंघ फेररचनेनंतर दक्षितेली राज्यांचा लोकसभेतील वाटा खूपच कमी होण्याची शक्यता आहे.
दक्षिणेकडील राज्यांवर परिसीमनाचा परिणाम
2026 मध्ये होणारे आगामी परिसीमन (मतदारसंघ फेररचना) दक्षिणेकडील राज्यांसाठी आव्हान निर्माण करेल. या राज्यांनी प्रभावी लोकसंख्या नियंत्रण उपाय लागू केले आहेत. परंतु गंमत अशी आहे की दक्षिणेकडील राज्यांना आता राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत तोटा सहन करावा लागू शकतो. सध्याच्या लोकसंख्येच्या आकड्यांवर आधारित संसदीय जागांचे फेरवाटप करण्याच्या परिसीमन प्रक्रियेमुळे तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यांसारख्या राज्यांसाठी जागा वाटप कमी होण्याची शक्यता आहे. कारण या राज्यांची लोकसंख्या उत्तरेकडील लोकसंख्येपेक्षा कमी आहे.
परिसीमन म्हणजे नेमकं काय? :काळानुसार लोकसंख्येत बदल होत असतो. याच बदलाला लक्षात घेऊन लोकसभा तसंच विधानसभा मतदारसंघांच्या रचनेत फेरबदल करण्यात येतो. यालाच परिसीमन असं म्हटलं जातं. देशातील वेगवेगळ्या भागात लोकसंख्येचे प्रमाण कमी-जास्त असतं. म्हणूनच प्रत्येक भागांना लोकसंख्येच्या आधारावर समान प्रतिनिधीत्व मिळावं म्हणून परिसीमन करण्यात येतं.
लोकसंख्येच्या प्रणातील लोकसभेच्या जागा
- आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सध्या 42 जागा (एकूण जागांच्या 7.73 टक्के) आहेत. परंतु सीमांकनानंतर 543 जागांच्या लोकसभेत त्यांना 34 जागा (6.26 टक्के) मिळण्याची अपेक्षा आहे. जर लोकसभेच्या एकूण 848 जागा झाल्या तर 54 जागा (6.37 टक्के) मिळण्याची शक्यता आहे.
- कर्नाटकामध्ये सध्या 42 जागा (एकूण जागांच्या 5.15 टक्के) आहेत. परंतु सीमांकनानंतर 543 जागांच्या लोकसभेत त्यांना 26 जागा (5.15 टक्के) मिळण्याची अपेक्षा आहे. जर लोकसभेच्या एकूण 848 जागा झाल्या तर 41 जागा (4.83 टक्के) मिळण्याची शक्यता आहे.
- केरळमध्ये सध्या 20 जागा (एकूण जागांच्या 3.68 टक्के) आहेत. परंतु सीमांकनानंतर 543 जागांच्या लोकसभेत त्यांना 12 जागा (2.21 टक्के) मिळण्याची अपेक्षा आहे. जर लोकसभेच्या एकूण 848 जागा झाल्या तर 20 जागा (2.36 टक्के) मिळण्याची शक्यता आहे.
- तामिळनाडूमध्ये सध्या 39 जागा (एकूण जागांच्या 7.18 टक्के) आहेत. परंतु सीमांकनानंतर 543 जागांच्या लोकसभेत त्यांना 31 जागा (5.71 टक्के) मिळण्याची अपेक्षा आहे. जर लोकसभेच्या एकूण 848 जागा झाल्या तर 39जागा (2.36 टक्के) मिळण्याची शक्यता आहे.