वॉशिंग्टन Joe Biden Covid Positive :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची (Joe Biden Covid Positive) लागण झालीय. व्हाईट हाऊसनं एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली. तसंच व्हाईट हाऊसनं बुधवारी (17 जुलै) अधिकृत प्रकाशनात सांगितलं की, ते (बायडेन) डेलावेरला परत येतील आणि तिथं स्वत:ला क्वारंटाइन करतील.
जो बायडेन काय म्हणाले : व्हाईट हाऊसच्या निवेदनानंतर जो बायडेन यांनी स्वत: आपल्या एक्स अकाउंटवरुन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. ते म्हणतात, “माझी कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आलीय. मात्र, मी फार आजारी असल्याचं मला वाटत नाही. मला आता ठीक वाटतंय. अमेरिकेतील नागरिकांच्या शुभेच्छा माझ्यासह आहेत. मला लवकरच बरं वाटेल याची मला खात्री आहे. तसंच मी सध्या स्वतःला क्वारंटाइन करतोय. मात्र, अमेरिकेतल्या नागरिकांसाठी जी कामं करायचीत ती मी करत राहणार.”
बायडेन यांच्या डॉक्टरांनी काय सांगितलं : जो बायडेन यांच्या प्रकृतीसंदर्भात अधिक माहिती देत बायडेन यांचे डॉक्टर केविन ओ कॉनर यांनी सांगितलं की, जो बायडेन यांच्यात कोरोनाची काही सौम्य लक्षणं दिसत आहेत. त्यांना सर्दी आणि खोकला झालाय. तसंच त्यांना बराच थकवाही जाणवतोय. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर आम्ही त्यांना अँटी व्हायरल डोस पॅक्सलोव्हिड दिलाय. सध्या त्यांची प्रकृती बरी असल्याचं ते म्हणाले. तर व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, जो बायडेन यांची लक्षणं सौम्य आहेत. त्यांचा श्वसन दर 16 वर सामान्य आहे, तर त्यांचे तापमान 97.8 वर स्थिर आहे, जे सामान्य आहे. त्यांची नाडी ऑक्सिमेट्री 97 टक्के सामान्य आहे, असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलंय.
निवडणूक प्रचाराला बसेल फटका :अमेरिकेच्या निवडणुकीत जो बायडेन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प असा सामना बघायला मिळतोय. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, त्यानंतर त्यांना अमेरिकेत मोठा पाठिंबा मिळतोय. हे पाहता निवडणुकीच्या शर्यतीत जो बायडेन सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या खूप मागे पडलेत. त्यामुळंच काही डेमोक्रॅट नेत्यांनी बायडेन यांना निवडणूक प्रचारातून माघार घेण्यासही सांगितलं होतं. असं असतानाच आता बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्याचा निवडणुकांच्या प्रचारावर परिणाम होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
हेही वाचा -
- जो बायडेन यांच्यावर उमेदवारी मागं घेण्यासाठी दबाव - US Presidential Elections
- पाकिस्तान अमेरिका संबंध सुधारणार; राष्ट्राध्यक्ष जो बायडननं लिहिलं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र - US Pak Ties
- अमेरिकेतील निवडणुकांपूर्वी जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प फेस टू फेस; काय आहे 'प्रेसिडेन्शियल डिबेट'? - First Presidential Debate