तुर्की : तुर्कीची राजधानी असलेल्या अंकारा येथील एव्हिएशन कंपनी 'तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीज'च्या मुख्यालयावर बुधवारी (23 ऑक्टोबर) मोठा दहशतवादी हल्ला झाला. दोन दहशतवाद्यांकडून येथे अजूनही बेछुट गोळीबार सुरू आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. तर 22 जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. तसंच मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुर्कियाचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय.
तुर्कीच्या गृहमंत्र्यांची पोस्ट : तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक निवेदन जारी केलंय. यात त्यांनी लिहिलंय की, "तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. दुर्दैवानं या हल्ल्यात आमचे सैनिक हुतात्मा झाले आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत." दरम्यान, हल्ला झाला त्यावेळी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान हे त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करत होते.
दहशतवाद्यांमध्ये महिलेचाही समावेश? : एका माध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार, एर्दोगन यांनी या हल्ल्याला 'घृणास्पद दहशतवादी हल्ला' असं म्हटलंय. दुपारी 3:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) हल्ला झाल्यानंतर काही वेळातच तेथील स्थानिक माध्यमांनी घटनास्थळावरून प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये कहरामन कझान येथील परिसरात आगीमुळं धुराचे मोठे लोट दिसून आले. तर स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनास्थळी मोठा स्फोट झाला. त्यानंतर लगेच गोळीबार सुरू झाला. ब्रॉडकास्टर्सने दाखवलेल्या हल्ल्याच्या सुरक्षा कॅमेऱ्याच्या फोटोजमध्ये एक व्यक्ती बॅकपॅक घेऊन असॉल्ट रायफल धरून आहे. तर एक महिलाही शस्त्र घेऊन जाताना दिसत आहे. मात्र, आतापर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
जागतिक नेत्यांनी केला हल्ल्याचा निषेध : तुर्की संसद सदस्य आणि जागतिक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. ब्रिक्स परिषदेदरम्यान कझानमध्ये एर्दोगान यांच्या भेटीच्या सुरुवातीला पुतिन यांनी 'दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात शोक व्यक्त केला. तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी अलायन्सचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी देखील तुर्कियेला पाठिंबा दर्शवलाय. एक्सवरील एका पोस्टमध्ये रूटे म्हणालेत की, "अंकारामध्ये मृत आणि जखमींचे रिपोर्टमध्ये अत्यंत चिंताजनक आहेत. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी अलायन्स आपल्या मित्र देश तुर्कियेच्या पाठीशी उभा आहे. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो".
हेही वाचा -
- जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला, 7 मजूर ठार; अमित शाह यांनी दिला 'हा' इशारा
- इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर ठार, अमेरिकेच्या शस्त्रसंधीच्या आवाहनाला नकारघंटा - Israel attack on Hezbollah
- जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; उधमपूर येथील चकमकीत सीआरपीएफ अधिकाऱ्याला वीरमरण, तीन जवान जखमी - Udhampur Terror Attack