अबुधाबी(UAE) BAPS Hindu Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अबुधाबीमध्ये बांधलेल्या पहिल्या पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) हिंदू मंदिराचं उद्घाटन केलंय. यावेळी नागरिकांनी मोदींचा जयजयकारदेखील केल्याचं दिसून आलं आहे. अबुधाबीतील 'हे' पहिलं हिंदू मंदिर आहे. त्यामुळं BAPS मंदिर UAE मधील सांस्कृतिक, आध्यात्मिकतेचं महत्त्वाचं केंद्रबिंदू बनलं आहे.
असं आहे मंदिर : BAPS हिंदू मंदिरात 12 पिरॅमिड आकाराचे घुमट, 7 शिखर, 2 घुमट, 410 खांब आहेत. या मंदिराची उंची 180 फूट, लांबी 262 फूट तसंच रुंदी 108 फूट आहे. हे मंदिर 27 एकरावर बांधण्यात आलं आहे. या मंदिराच्या बांधकामात 30 हजार कोरीव दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या भिंतींवर शिल्पांद्वारे 250 हून अधिक कथा सांगण्यात आल्या आहेत. मंदिराचा बाह्य भाग राजस्थानातून आणलेल्या 15 हजार टनाच्या गुलाबी दगडानं बनवला आहे.
प्राचीन वास्तुकला पुनरुज्जीवित :राजस्थानातून आणलेला गुलाबी खडकांवर कुशल कारागिरांनी 30 हजारांपेक्षा जास्त नक्षीकाम केलं आहे. त्याच वेळी मंदिराच्या आतील भागात 6 हजार टन सुंदर इटालियन संगमरवर वापरण्यात आला आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी 3 हजार घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळं दगडी कोरीव कामातून अस्सल प्राचीन कला तसंच वास्तुकला पुनरुज्जीवित झाली आहे.
बांधकामात 50 हजारांहून अधिक लोकांचा सहभाग : या BAPS हिंदू मंदिराच्या उद्घानच्या कार्यक्रमात 50 हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अभिनेता संजय दत्त, अक्षय कुमार यांसारख्या अभिनेत्यांचा समावेश आहे. मंदिर पूर्णपणे भारतीय शैलीत बांधलेलं असून मंदिर संकुलात मुलांसाठी वर्गखोल्या, प्रदर्शन केंद्र, खेळाचे मैदान देखील आहे. याशिवाय मंदिर संकुलात स्वागत केंद्र, प्रार्थना हॉल, बहुउद्देशीय हॉल, कम्युनिटी सेंटर, थीमॅटिक गार्डन, ॲम्फीथिएटर, फूड कोर्ट, गिफ्ट शॉपसह प्रदर्शन, वाचनालय, खेळाचे मैदानाचा समावेश आहे. मंदिराच्या आतील मुख्य प्रार्थनागृहाची रचना 3 हजार लोकांच्या बसण्यासाठी करण्यात आली आहे.
हे वाचलंत का :
- भाजपामधील इनकमिंगमुळं निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय?
- अशोक चव्हाणांमुळं नारायण राणेंची पुन्हा राजकीय गोची?
- आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर'च्या रिलीजची तारीख, स्क्रिप्टचे अपडेट केले शेअर