वॉशिंग्टन -बेकायदेशीरपणं राहणाऱ्या भारतीयांची अमेरिकेनं हकालपट्टी केल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर उपस्थित केला. जर भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत असतील तर त्यांना भारत त्यांना परत घेईल. मात्र, अमेरिकेनं मानवी तस्करीची व्यवस्था संपविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे पंतप्रधान मोदींनी मत व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान म्हणाले, " अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे बहुतांश हे सामान्य कुटुंबातील आहेत. तर अनेकजण चुकीच्या मार्गदर्शनामुळे मानवी तस्करी प्रकरणातील आहेत. त्यांना मोठी स्वप्ने दाखवून आणि चुकीचे मार्गदर्शन केल्यानं ते अमेरिकेत पोहोचले आहेत. त्यामुळे आपण संपूर्ण मानवी तस्करीच्या व्यवस्थेवर हल्ला करायला हवा. भारत आणि अमेरिकेनं मानवी तस्करीची संपूर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या व्यवस्थेविरोधात आपला सर्वात मोठा लढा आहे. ट्रम्प ही व्यवस्था नष्ट करण्यासाठी आम्हाला संपूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास आहे."
जे लोक बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. अमेरिका आणि भारताशी संबंधित बोलायचं झालं तर जे खरोखर भारताचे नागरिक आहेत, त्यांना भारतात परत घेण्याची आमची इच्छा आहे. हे आम्ही वारंवार सांगत आहोत-पंतप्रधान नरेंद्र मोदी