इस्लामाबाद Pakistan Election : पाकिस्तानमधील निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयनं (पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ़) पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी 100 हून अधिक जागा जिंकल्या. दरम्यान, पीटीआयचे कार्यकर्ते देशभरात निदर्शनं करत आहेत. निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा त्यांचा आरोप आहे. निदर्शनांदरम्यान, निवडणूक आयोगानं 15 फेब्रुवारी रोजी काही जागांवर पुन्हा निवडणूक घेण्याची घोषणा केली.
अपक्षांनी 100 हून अधिक जागा जिंकल्या : निवडणूक आयोगाच्या मते, पीटीआय समर्थित अपक्ष उमेदवारांनी 100 हून अधिक जागा जिंकल्या. अंतिम निकालात नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझला (पीएमएल-एन) 72 जागा मिळाल्या आहेत. तर बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीनं (पीपीपी) 54 जागा जिंकल्या. इतर लहान पक्षांनी एकत्रितपणे 27 जागा जिंकल्या आहेत. ते कोणत्याही युती सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
दोन्ही नेत्यांचा विजयाचा दावा : पीएमएल-एनचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी देखील विजयाचा दावा केला आहे. त्यांचा पक्ष 'सर्वात मोठा पक्ष' असल्याचं ते म्हणाले. मात्र, आपल्याला बहुमत मिळालं नसल्याचं मान्य करत त्यांनी आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांना आमंत्रित केलंय. दुसरीकडे, तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही विजयाचा दावा केला आहे. इम्रान खान यांच्यासाठी ही निवडणूक करो किंवा मरो सारखी होती, जिथे त्यांच्या पक्षानं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी चमकदार कामगिरी केली आहे. इम्रान खान यांच्या पक्षावर निवडणूक आयोगानं बंदी घातली होती. पीटीआय समर्थित अपक्षांना बहुमत मिळूनही, ते पाकिस्तानच्या निवडणूक कायद्यानुसार सरकार बनवू शकत नाहीत. निकाल जाहीर झाल्यापासून तीन दिवसांत त्यांना पक्षात सामील होऊन सरकार स्थापन करावं लागेल. अपक्ष उमेदवारांना राष्ट्रीय असेंब्लीच्या 70 राखीव जागाही मिळू शकत नाहीत.