वॉशिंग्टन Mumbai Terror Attack : मुंबईवरील 26/11 बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी भारत प्रयत्न करत आहे. मात्र हा खटला अद्यापही प्रलंबित आहे. आता दहशतवादी तहव्वूर राणा यानं शिकागोमधील कारागृहातून तत्काळ सुटण्याची मागणी केली आहे. मात्र अमेरिकन कोर्ट ऑफ अपील रेकॉर्ड्सनुसार सहायक यूएस अॅटर्नी आणि क्रिमिनल अपील प्रमुख ब्रॅम एल्डन यांनी त्याच्या या मागणीला जोरदार विरोध केला. अमेरिका-भारत प्रत्यार्पण कराराच्या तरतुदींनुसार दहशतवादी तहव्वूर राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य आहे. अमेरिकेच्या कनिष्ठ न्यायालयांनी आधीच तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे, यावर ब्रॅम एल्डन यांनी जोर दिला. भारतानं तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची केलेली मागणी योग्य आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा निर्णय योग्य :मुंबईवरील 26/11 बॉम्बस्फोट हल्ल्यात तब्बल 166 नागरिकांचा बळी गेला, तर 239 जण जखमी झाले. या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणा हा शिकागो इथल्या कारागृहात बंदीस्त आहे. त्याच्या प्रतर्पणाची मागणी भारत करत आहे. याबाबत अमेरिकेच्या कनिष्ठ न्यायालयानं तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. मात्र हे प्रकरण अद्याप वरिष्ठ न्यायालयात अडकलं आहे. याप्रकरणी यूएस अॅटर्नी ब्रॅम एल्डन यांनी याबाबत जोरदार युक्तीवाद केला. "अमेरिकन कनिष्ठ न्यायालयानं तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा घेतलेला निर्णय योग्य आहे. कराराच्या तरतुदींनुसार तहव्वूर राणा भारताकडं प्रत्यार्पण करण्यायोग्य आहे. भारतानं त्याच्यावर दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याच्या सहभागावरुन खटला चालवण्याचं कारण निश्चित केलं. त्याच्यामुळे 166 नागरिकांचा बळी गेला, तर 239 जण जखमी झाले," असा युक्तीवाद यूएस अॅटर्नी ब्रॅम एल्डन यांनी केला. "तहव्वूर राणा यानं बॉम्बस्फोट करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी गटाला मदत केल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत," असा युक्तीवादही त्यांनी केला.