नवी दिल्ली Microsoft Faces Global Outage :मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील संगणकीय व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. यामुळे विमानसेवा देखील विस्कळीत झाली आहे. मायक्रोसॉफ्टचा वापर करणाऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतातील स्पाइसजेटने ट्विटरवर पोस्ट केलं की, ते त्यांच्या सेवा देताना अडचणींना सामोरे जात आहेत. यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या बुकिंग, चेक-इन आणि ऑनलाइन सेवांवर परिणाम होत आहे.
विमानसेवेवर परिणाम :सर्व्हरमधील बिघाडामुळे स्पाइस जेटनं विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया सुरू केल्या आहेत. अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांतून अशाच प्रकारच्या समस्या येत आहेत. सर्व्हरमधील बिघाडामुळे प्रमुख बँका, माध्यमं आणि विमान कंपन्यांवर परिणाम झालाय. शेअर बाजारांवरही याचा परिणाम झाला आहे.
इंटरनेट युजर्सला फटका :जगभरातील लाखो विंडोज वापरकर्त्यांना या इंटरनेट आउटेजचा प्रचंड फटका बसला आहे. गंभीर प्रणालींच्या तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प झाल्या. सामान्यतः या परिस्थितीला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) म्हणून ओळखले जाते. वापरकर्त्यांनी अचानक शटडाउन आणि रीस्टार्ट झाल्याची तक्रार केली. CrowdStrike या सायबर सुरक्षा कंपनीच्या अलीकडील अपडेटमुळे हे सगळं झालं असल्याची माहिती मिळत आहे.
सेवा खंडित -या घटनेचा मायक्रोसॉफ्टच्या अझर क्लाउड कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्मवर देखील परिणाम झाला आहे. सुरुवातीला मध्य अमेरिकेतील ग्राहकांना याचा फटका बसला. विविध ऍप्लिकेशन्स आणि सेवांना आधार देणाऱ्या त्यांच्या मजबूत पायाभूत सुविधांसाठी प्रसिद्ध असलेल्या Azureला मोठ्या प्रमाणात सेवा खंडित झाल्याचा सामना करावा लागला.
ब्लू स्क्रीन एरर -मायक्रोसॉफ्टने त्यांच्या Microsoft 365 सूट अंतर्गत सुरू असलेल्या सेवांना यामुळे फटका बसल्याचंही स्पष्ट केलय. यावर कंपनीनं तातडीनं काही उपाययोजना केल्यात. मात्र त्याचा फारसा उपयोग प्रत्यक्ष झाला नसल्याचं दिसून येतय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, विशेषत: X (पूर्वीचे ट्विटर), निराशाजनक विंडोज वापरकर्त्यांकडून सतत ब्लू स्क्रीन एररचा सामना करत असल्याच्या पोस्टने भरला आहे. डिव्हायसेस निराशाजनक रीस्टार्ट लूपमध्ये अडकल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे. आउटेजचे प्रमाण इतके होते की मायक्रोसॉफ्टच्या थेट ग्राहकांसह इतर संलग्न कंपन्यांनाही त्याचा फटका सहन करावा लागला. कमी किमतीची एअरलाइन फ्रंटियर एअरलाइन्सची अमेरिकेमध्ये काही उड्डाणे रद्द करावी लागली.
विमानतळावर गोंधळाचे वातावरण -यामुळे मुंबईतही विमानतळावर गोंधळाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी प्रवाशांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. स्पाईसजेट, इंडिगो, अकासा या विमान कंपन्यांना या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. याबाबत अकासा एअर लाईनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार आम्हाला सेवा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चेक इन बुकिंग आणि इतर अनुषंगिक सेवांवर याचा काहीसा प्रतिकूल परिणाम झाला आहे. मात्र आम्ही त्याचा फटका प्रवाशांना बसू नये यासाठी पर्यायी उपायोजना करत आहोत. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी चेक इन प्रक्रियेसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
उड्डाणांवर परिणाम -इंडिगो विमानसेवेने याबाबत ट्विट करुन प्रवाशांना माहिती दिली. आम्हाला तांत्रिक सेवा पुरवणाऱ्या मायक्रोसॉफ्टमध्ये बिघाड झाल्याने आमच्या कंपनीच्या सेवेवर काहीसा परिणाम झाला आहे त्यामुळे बुकिंग करणे, चेक इन, बोर्डिंग पास तयार करणे या प्रक्रियेला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. तर काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे. मात्र प्रवाशांकडून यावेळी दाखवण्यात येत असलेल्या संयमाचे कंपनीने कौतुक केले.
स्पाइस जेट कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, आमच्या सेवांवर तांत्रिक बिघाडाचा थोडा परिणाम झाला असून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच ही समस्या मार्गी लागेल. या समस्येमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे तसंच प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन केलय.एअर इंडियाने देखील याबाबत माहिती दिली असून प्रवाशांनी या अडचणीच्या काळात सहकार्य करावे, असं आवाहन केलं आहे. जागतिक पातळीवर सेवा पुरवठादार कंपनीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा हा फटका असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.