इस्लामाबाद : five Chinese killed in terrorist attack : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी नागरिकांसह एका स्थानिकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील शांगला येथे चिनी नागरिकांच्या ताफ्यावर हल्ला झाला. आत्मघाती हल्लेखोरानं चिनी नागरिकाच्या कारला धडक दिल्यानं कार खड्ड्यात पडली, असं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत कोणत्याही गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
घटनास्थळी सुरक्षा कडक व्यवस्था :प्रांतातील शांगला जिल्ह्यातील बिशाम भागात झालेल्या या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. इस्लामाबादहून कोहिस्तानकडं जाणाऱ्या बसला विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनानं धडक दिल्यानं ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. आतापर्यंत कोणत्याही गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बिशाम पोलीस स्थानकाचे प्रभारी, बख्त जहीर यांनी सांगितलं की, हा 'आत्मघाती स्फोट' होता. या घटनेबाबत संबंधित अधिकारी पुरावे गोळा करत आहेत. घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून मृतदेह रुग्णालयात नेण्यात येत आहे.
चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचं काम सुरू : 'आत्मघातकी हल्ला कसा घडला याचा तपास सुरू आहे.'आत्मघातकी हल्ल्यात बसमध्ये प्रवास करणारे किमान पाच चिनी नागरिक ठार झाले असून अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. शांगला शहर कोहिस्तानच्या जवळ आहे. जिथं 2021 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नऊ चिनी लोकांसह 13 लोक मारले गेले होते. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत चालणाऱ्या अनेक प्रकल्पांवर हजारो चीनी कामगार पाकिस्तानमध्ये काम करत आहेत.
दहशतवाद्यांनी बंदरालाही केलं लक्ष्य :पाकिस्तानाला दहशतवादी हल्ले नवे नाहीत. यापूर्वी 20 मार्च रोजी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी ग्वादर बंदराला लक्ष्य केलं होतं. पाकिस्तान चीनच्या मदतीनं हे बंदर विकसित करण्यात येत आहे. ज्याला स्थानिक बलुच लोक विरोध करत आहेत. यावरून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून चिनी नागरिकांना अनेकदा लक्ष्य केलं जातं.
चिनी नागरिकांवर पाकिस्तानमध्ये कधी झाले हल्ले :
20 मार्च 2024 : बलुच बंडखोरांनी ग्वादर बंदरावर हल्ला केला होता. हे बंदर चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचं प्रमुख केंद्र आहे. यात सात जणांचा मृत्यू झाला होता.
13 ऑगस्ट 2023 :13 ऑगस्ट रोजी अज्ञात अतिरेक्यांनी चिनी ताफ्यावर हल्ला केला होता. पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात हा हल्ला करण्यात आला. यात तीन सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तसंच दोन हल्लेखोर ठार झाले होते. तीन चिनी नागरिक जखमी झाले होते.
26 एप्रिल 2022 : कराचीमध्ये एका महिला आत्मघाती बॉम्बरनं तीन चिनी शिक्षकांची हत्या केली होती.
14 जुलै 2021: चिनी कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये स्फोट झाला होता. यात नऊ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला तसंच इतर चार नागरिकांचा मृत्यू झाला.