Pregnancy stretch marks :गरोदर असताना महिलांच्या शरीरात बरेच बदल होतात. पोटावरील स्ट्रेच मार्क्स त्यापैकीच एक आहे. गर्भवती असताना बाळाला समावून घेण्यासाठी पोटाचा विस्तार होतो. त्यामुळे त्वचा ताणली जाते. त्वचा ताणल्यामुळे महिलांच्या शरीरावर त्याच्या खुणा दिसू लागतात, यालाच स्ट्रेच मार्क्स म्हणतात. हे मार्क्स केवळ ओटीपोटावरच नव्हे तर स्तन, मांड्या आणि हातावरही दिसतात. गर्भाधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत हे स्ट्रेच मार्क्स येतात. हे पूर्णपणे रोखता येत नसले तरी काही टिप्स पाळल्यास ते कमी होऊ शकतात. ते कसे? पाहूया..
- नारळ तेल: सर्वसाधारणपणे, त्वचेवर नियमितपणे व्हर्जिन नारळ तेल लावल्यानं आपल्याला बरेच फायदे होवू शकतात. गरोदर महिलांनी डाग असलेल्या जागेवर खोबरेल तेल लावून थोडावेळ मसाज करून पाण्यानं धुतल्यास डाग निघून जाण्याची शक्यता असते.
- बदामाचं तेल: बदामाच्या तेलानं पोटाच्या भागाला रोज मसाज केल्यानं डाग दूर होण्यास मदत होते. त्यासाठी, साखर आणि बदाम तेल समान प्रमाणात घ्या आणि ते एकत्र मिसळा. हे मिश्रण स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर हलक्या हाताने चोळा. त्यानंतर, काही वेळानं कोमट पाण्यानं धुवा. असं आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा करा. यामुळे तुम्हाला चांगला परिणाम होईल.
- कोरफड जेल: एलोविरा जेलमुळे त्वचेच्या संबंधित अनेक समस्या दूर होतात. प्रसूतीनंतर स्त्रियांनी दररोज आंघोळीनंतर स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर एलोविरा जेल लावल्यास त्यांना फायदा होवू शकतो. यामुळे मार्क्स निघून जातात, असं तज्ज्ञांच म्हणणे आहे.
- एरंडेल तेल:बाळंतपणाच्या वेळी उद्भवणारे स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी ओटीपोट, खांदे, गुडघ्याच्या वरच्या भागावर आणि इतर जागी एरंडेल तेल रोज लावा. कालांतराणं हे डाग निघून जातील.
- बॉडी ब्रश :ब्रशनं घासून आंघोळ केल्याने शरीरातील सर्व अवयवांमध्ये रक्त सुरळीतपणे वाहते. त्वचेतील घाण आणि विषारी द्रव्ये घामाच्या ग्रंथीद्वारे बाहेर टाकली जातात. यामुळे त्वचा टवटवीत होते आणि डागमुक्त राहण्यास मदत होते.