हैदराबाद Which Water Is Healthier For Bath :निरोगी आणि ताजेतवानं रहाण्यासाठी आंघोळ आवश्यक मानली जाते. आंघोळ केल्यानं शरीराचा थकवा जातोच. तसंच मेंदूलाही तरतरी मिळते. काही जणांना सकाळी तर काहींना रात्री आंघोळ करून झोपायला आवडतं. अनेकजण दिवसातून एकदा आंघोळ करणं योग्य मानतात. तर काहींना दिवसातून किमान 2-3 वेळा आंघोळ केल्याशिवाय चैन पडत नाही. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत... पण तुम्हाला माहित आहे का, आंघोळीचा शरीराला फायदा व्हावा म्हणून कोणत्या पाण्यानं आणि किती वेळा आंघोळ करावी? चला तर आज हेच जाणून घेऊ या.
तज्ज्ञ काय म्हणतात?तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही व्यक्तीनं एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ करू नये. कारण आपल्या शरीरामधून नैसर्गिक ऑईल निघत असतं. यामुळे त्वचा नितळ आणि मुलायम राहण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ केली तर शरीरातून निघणारं नैसर्गिक ऑइल धुतलं जाईल. परिणामी तुमची त्वचा कोरडी होईल. या कारणामुळं तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात खूप गरम आणि उन्हाळ्यात फार थंड पाण्यानं आंघोळ करणं टाळावं.
"मेकाहाराच्या त्वचा विभागाचे एचओडी डॉ. मृत्युंजय सिंह आणि अनेक तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचा संवेदनशील होते. त्यामुळं कडकडीत गरम पाण्यानं आंघोळ करणं टाळावं. तसंच उन्हाळ्यातही जास्त थंड पाण्यानं आंघोळ करू नये. असं केल्यानं तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. म्हणून कोमट पाण्यानं किंवा खोलीच्या तापमानात ठेवलेल्या पाण्यानं आंघोळ करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.''
आंघोळीसाठी कोणते पाणी जास्त फायदेशीर : कोमट पाण्यानं आंघोळ केल्यानं शरीराच्या तापमानावर फारसा परिणाम होत नाही. शिवाय शरीरातील रक्ताभिसरण वाढते. त्याचबरोबर सर्दी-खोकला सारखे आजारही दूर होतात. ज्यांना स्नायूंमध्ये तणाव जाणवतो त्यांच्यासाठी गरम पाण्यानं आंघोळ करणं चांगलं आहे. यामुळं स्नायूंना आराम मिळतो आणि अस्वस्थता कमी होते.
गरम पाण्याच्या आंघोळीचे फायदे : गरम पाण्यानं आंघोळ केल्यास झोप चांगली लागण्यास मदत मिळते. गरम शॉवरची वाफ तुमच्या चेहऱ्यावरील छिद्रांमधील ऑइल आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. गरम पाण्याने आंघोळ केल्यानं तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. कारण उष्णतेमुळे मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन उत्तेजित होतात. यामुळं तणाव कमी होतो. त्याचबरोबर डोकेदुखी देखील कमी होते.
गरम पाण्याने आंघोळीचे तोटे :गरम पाण्यानं आंघोळ केल्यास त्वचा कोरडी होते. गरम पाण्यामुळे केसांमधील केराटिन पेशी कमकुवत होतात. यामुळे केस गळू लागतात. त्याचबरोबर त्वचेच्या संरक्षणात्मक थरावर देखील परिणाम होतो. यामुळं मुरुम येवू शकतात. उच्च रक्तदाब किंवा हृदयाच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी गरम पाणी त्रासदायक आहे.