हैदराबाद Dengue Plasma Leakage : पावसाळ्यात सर्वात धोकादायक असते ती म्हणजे डेंग्यूची समस्या. देशातील अनेक भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं डॉक्टरांनी प्लाझ्मा गळतीच्या धोक्यांबाबत इशारा दिला आहे. प्लाझ्मा गळती हे 'प्लेटलेट रिडक्शन' पेक्षा जास्त धोकादायक मानलं जातं. रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा वाढता ओघ दिसत आहे, ज्यामुळे प्लाझ्मा गळतीच्या गंभीर समस्येकडे डॅाक्टरांनी लक्ष वेधलं आहे.
काय आहे प्लाझ्मा गळती :डेंग्यू विषाणूमुळे रक्तवाहिन्यांच्या आतील थर एंडोथेलियममध्ये सूज निर्माण होते. यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये अंतर निर्माण होते, ज्यामुळे ऊतींमधून प्लाझ्मा गळती होण्यास सुरुवात होते. काही रुग्णांसाठी डेंगी संसर्गाच्या तीव्रतेमध्ये प्लाझ्मा गळती हा एक महत्त्वाचा घटक आहे. सुरुवातीलाच यावर लक्ष दिलं नाही तर, स्थिती हेमोरेजिक शॉक सिंड्रोममध्ये बदलू शकते, जी घातक देखील असू शकते.
डॉक्टरांचा सल्ला : डॅाक्टरांच्या मते डेंग्यूची लागण होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. लागण झाल्यास तत्काळ डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉ. राजा राव म्हणतात, "डेंग्यू झाल्यास घाबरण्याची गरज नाही, परंतु निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. डेंग्यूवर कोणतेही विशिष्ट औषध नसले तरी, तापावर नियंत्रण ठेवण्यासाठी पॅरासिटामॉलसह द्रवपदार्थाचे सेवन केलं जाऊ शकते." डेंग्यूच्या 10 टक्के रुग्णांमध्ये प्लाझ्मा गळतीचा धोका असतो. डॉ. राजा राव म्हणतात, "प्लाझ्मा गळतीची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं आहे."
अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंग वर क्लिक करा