मुंबई : मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या डोक्यावर सध्या वेगवेगळ्या आजारांची टांगती तलवार आहे. अशावेळी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, यावर आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी मार्गदर्शन केलय.
हवेच्या गुणवत्तेत घसरण : मुंबईतील दादर, भांडुप, लोअर परेल, सायन, बोरिवली या ठिकाणी मंगळवारी (3 डिसेंबर) हवेचा निर्देशांक 100 च्या आत होता. तर माझगाव, देवनार, गोवंडी, शिवाजीनगर, वरळी या भागात 129 ते 177 इतका होता. त्यामुळं सोमवारी आणि मंगळवारी मुंबईतील हवेतील गुणवत्ता खराब झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) विविध आजारांचा त्रास : हवेची गुणवत्ता खालावल्यामुळं याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकला, सायंकाळी खोकल्यात वाढ होणे, नाक गळणे, घसा दुखणे इत्यादी आजारांच्या रुग्णांमध्ये मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना घशामध्ये खवखव किंवा घशाचा त्रास अधिक जाणवतोय. वातावरणातील या प्रदूषणामुळं आजारात वाढ झाल्यानं सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची नोंद आहे.
कशी घ्याल काळजी? : यासंदर्भात बोलताना आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "मुंबईतील प्रदूषण वाढीला अनेक कारणं आहेत. जसे की, गाड्यातून बाहेर पडणार धूर, रासायनिक कंपन्यातून बाहेर पडणारा धूर तसंच मुंबईत अनेक ठिकाणी ब्रिजेस, मेट्रो, मोठमोठ्या प्रकल्पांचं काम सुरू असल्यामुळं त्यातील धुळीचे तसंच हवेतील बारीक-बारीक कण हे माणसाच्या शरीरात जातात. परिणामी श्वसनाचा त्रास जाणवतो. यामुळं खोकला, खवखव तसंच न्यूमोनिया देखील होऊ शकतो. तसंच फुफ्फुसाला सूज पण येऊ शकते. या सर्वांची काळजी घ्यायची असेल तर सकाळी फिरण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावा. लहान मुलांनाही शाळेत पाठवताना त्यांच्या तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. तसंच पाणी कोमट करुन प्यायला हवं. हे करुनही बरं नाही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत", असा सल्ला भोंडवे यांनी दिलाय.
हेही वाचा -
- दिल्लीत हवेची गुणवत्ता चिंताजनक; थंडीचा कडाका वाढल्यानं नागरिक हवालदिल
- वायू प्रदूषणाच्या अगदी कमी पातळीच्या सतत संपर्कामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो
- ठाण्यातील हवेचा दर्जा पुन्हा घसरला ; जाणून घ्या कोणत्या भागातील हवा आहे सर्वाधिक प्रदूषित