Tips for happy married life:नातं कोणतही असो मन जुळायला वर्ष लागतात. परंतु तुटायला एक क्षणही लागत नाही. नात्यामध्ये प्रेम,रुसवा-फूगवा साहाजिक आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रेम आणि परस्पर विश्वास आवश्यक आहे. पती-पत्नीच्या नात्यात छोटी-मोठी भांडणं, भावनिक समस्या निर्माण होतात. यामुळं नात्यातील गोडवा वाढतो शिवाय नातं देखील घट्ट होतं. परंतु कधी कधी अशी वेळ येते. ज्यामुळे नात्यात आंबटपणा येतो आणि नाती कधी तुटतात हे कळत देखील नाही. नवरा-बायको असो वा प्रेमी जोडपं सर्व नाती विश्वासाच्या पायावर आधारीत असतात. एकदा का हा विश्वास डगमगला की, नाती सँडबॉक्सप्रमाणं तुटतात.
आज आपण 8 कारणांबद्दल बोलणार आहोत, ज्या सुखी वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करू शकतात. पती पत्नीच्या गोड नात्यात तणाव वाढला की, दोघेही एकमेकांपासून दूर जातात. अनेक लोकांचं घटस्फोट देखील होतं.
- भांडण:अनेकवेळा पती पत्नीमध्ये शुल्लक कारणांवरून भांडण होतात आणि याचं रुपांतर मोठ्या वादात होतं. कधी-कधी नवरा बायको भांडण करण्याऐवजी एकमेकांना दाबण्याचा प्रत्यत्न करतात. परिणामी दोघांमध्ये ताणतणाव वाढतो. पुढं या चुकांमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो.
- भावनिकरित्या संलग्न नसणं: वैवाहिक जिव्हाळ्यामुळं नातं अधिक गोड होतं. जिव्हाळ्याचा अर्थ म्हणजे केवळ शारीरिक संबंध नाही तर भावनिक नातं जे देखील खूप महत्वाचं आहे. कोणत्याही नात्यासाठी भावनिक जोड आवश्यक असतं. पती-पत्नीमध्ये भावनिक जोड नसल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. दोघेही एकमेकांच्या भावना समजून घेत नाहीत किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते. ज्यामुळे दोघांमधील अंतर वाढतं.
- एकमेकांचा अनादर करणं: प्रेमासारख्या नात्यात एकमेकांबद्दलचा आदरही खूप महत्त्वाचा असतो. कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता आणि वाईट सवयी असतात. परंतु त्यावरून तुमच्या जोडीदाराचा अपमान केल्यास नातं खराब होते. कधी-कधी एकमेकांचं कौतुक आणि आदर केल्यानं नातं आणखी घट्ट होतं.
- एकमेकांना गृहीत धरणं: कधीकधी जोडीदार एकमेकांना गृहीत धरतात. यामुळं जोडीदार पूर्वीप्रमाणं काळजी घेत नाही आणि हळूहळू प्रेमाची भावना कमी होऊ लागते. आपल्या जोडीदाराला काय वाटतं, एखाद्या गोष्टीवर त्याचं मत काय? याची नेहमी काळजी घेतली पाहिजे. कारण काही चुकीच्या भावनांमुळं नाते हळूहळू कमकुवत होत जातं.
- दोघांमधील कनेक्शनचा अभाव:सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीमधील चांगलं नातं आवश्यक आहे. आपल्या जोडीदाराचं ऐकणं, त्याच्या भावना समजून घेणं आणि आपल्या भावना त्याच्यासमोर ठेवणं हे नातेसंबंध टिकवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. काही अडचण असेल तर दोघे मिळून त्यावर मार्ग काढू शकतात. मनातील भावना व्यक्त केल्यानं गैरसमज होणार नाही.
- आर्थिक समस्या:आर्थिक समस्यांमुळं नातं तुटण्याची अनेक प्रकरणं आहेत. आर्थिक परिस्थिती भक्कम नसल्यास पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असतात. आर्थिक अस्थिरतेमुळं पती पत्नीच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. लग्नाचं वाढदिवस किंवा वाढदिवसासारख्या विशेष दिवशी चांगल्या भेटवस्तू देऊ शकत नाही. पैशाच्या कमतरतेमुळं वैवाहिक जीवनात संघर्ष निर्माण होतो, जो हळूहळू विभक्त होण्यास कारणीभूत ठरतो.
- जीवनातील भिन्न ध्येय:लोकांच्या आकांक्षा आणि उद्दिष्टेही काळानुसार बदलतात. कधीकधी पती-पत्नी एकमेकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी साथ देत नाहीत. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. दोघेही एकमेकांपासून दूर राहण्याचा कठोर निर्णय घेतात.
- वेळ न देणे : वैवाहिक जीवन असो वा प्रेमसंबंध, आजच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. एकमेकांच्या सहवासात क्वालिटी टाइम घालवता येत नाही. दोघेही आप आपल्या कामात व्यग्र असतात. यामुळे नात्यातील गोडवा कधी संपतो ते कळत नाही.