Health Benefits Ragi: फॅशन किंवा ट्रेंड केवळ कपड्यांशी संबंधित नसून ते व्यायाम किंवा आहाराशी देखील संबंधित असू शकते. फूड ट्रेंड्स बाबत बोलायचं झालं तर, आजच्या युगात खाद्य पदार्थांशी संबंधित नवीन ट्रेंड नेहमीच उदयास येत असतात, जे एखाद्या विशिष्ट आहाराशी संबंधित असू शकतात. याबद्दल एक अतिशय चांगली गोष्ट अशी आहे की, कधीकधी या ट्रेंडमुळे, लोकांना नवीन प्रकारच्या आहारांची माहिती होते. जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु बहुतेक लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसते. असाच एक पौष्टिक पदार्थ म्हणजे नाचणी. पूर्वीच्या काळी नाचणी हे गरीब किंवा मजुरांचे अन्न मानले जायचे. परंतु आजकाल नाचणी आरोग्याबाबत जागरूक असलेल्या लोकांच्या ताटाचा महत्त्वाचा भाग बनत आहे, ही चांगली गोष्ट आहे. नाचणीचे सेवन केल्यानं आरोग्यदायी फायदे तर होतातंच. सोबत यामुळे काही वेळा शरीरात ॲसिडिटी किंवा इतर काही समस्या देखील उद्भवू शकतात.
- नाचणीचे गुणधर्म: आहार आणि पोषण तज्ज्ञ डॉ. दिव्या शर्मा सांगतात की, नाचणी हे असं अन्न आहे, जे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. नाचणी आपल्या शरीराला संपूर्ण पोषण घटक पुरवते. याव्यतिरिक्त, नाचणी ग्लूटेन-मुक्त देखील आहे. त्यामुळे ॲलर्जी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ज्यांना ग्लुटेनमुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो त्या लोकांसाठी नाचणी चांगली आहे.
- पोषक घटक:नाचणीमध्ये फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह, खनिजे, जीवनसत्त्वे B1, B3, B5 आणि B6 आणि पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण पुरेशा प्रमाणात असते. त्यामुळे हे केवळ हाडे आणि दात मजबूत बनवत नाही तर ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यास देखील उपयुक्त आहे. नाचणीमध्ये नऊ अत्यावश्यक अमीनो अॅसिड आढळतात. जे शरीर स्वतंत्रपणे तयार करू शकत नाही. नाचणी कर्करोगासह अनेक गंभीर आजार टाळण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये लोहाचे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यासही मदत होते. नाचणीमध्ये असलेले फायबर हृदय निरोगी ठेवते आणि फॅटी लिव्हर कमी करण्यास आणि पाचन तंत्रास निरोगी ठेवण्यास मदत करते. आहारातील फायबर व्यतिरिक्त, त्यात असलेले फायटिक अॅसिड आणि पॉलीफेनॉल खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. नाचणीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि ॲन्टी-डायबेटिक गुणधर्म तसंच वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत. तुमच्या न्याहारीमध्ये किंवा इतर कोणत्याही अन्नामध्ये विशेषतः हिवाळ्यात नाचणीचा समावेश केल्यास शरीरातील उष्णता आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते.
- नाचणीच्या सेवनाशी संबंधित समस्या
- नाचणीचे अनेक फायदे आहेत परंतु काहीवेळा सेवनाशी संबंधित खबरदारी पाळली गेली नाही किंवा आरोग्याविषयक काही समस्या असल्यास त्याचे सेवन आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. नाचणीमुळे होणारे आरोग्याचे नुकसान खालीलप्रमाणे आहे.
- नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्या लोकांना स्टोनची समस्या आहे, विशेषत: किडनी स्टोन किंवा किडनीशी संबंधित इतर कोणतीही समस्या आहे त्यांना नाचणी न खाण्याचा सल्ला दिला जातो.
- नाचणीचे सेवन केल्याने कधी कधी थायरॉईडच्या रुग्णांनाही त्रास होऊ शकतो.
- नाचणीमध्ये भरपूर फायबर आढळते. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यानं किंवा नाचणी नीट न शिजवता खाल्ल्यास काही लोकांमध्ये गॅस, बद्धकोष्ठता आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
- ज्या लोकांना आम्लपित्त, पोटात अल्सर किंवा जठराची सूज यासारख्या सामान्य पचनाच्या समस्या आहेत त्यांनी नाचणीचे सेवन टाळावं.
- नाचणी खाणं कसं फायदेशीर ठरू शकते?आहार आणि पोषण तज्ज्ञ डॉ. दिव्या शर्मा यांच्या मते, नाचणीसोबत पुरेसे पाणी पिणं खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय नाचणीचे सेवन नेहमी संतुलित प्रमाणात आणि योग्य प्रमाणात केले पाहिजे. त्यातील पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा होण्यासाठी ते नेहमी चांगलं शिजवून खाल्लं पाहिजे. एवढेच नाही तर नाचणी एकत्र करून खाणे अधिक फायदेशीर आहे. हिरव्या भाज्या, फळे आणि प्रथिनेयुक्त अन्नासोबत खाणे आरोग्यासाठी चांगलं असते. याशिवाय जर तुम्हाला नाचणीचं सेवन करायचं असेल तर हळूहळू त्याचा आहारात समावेश करा, जेणेकरून तुमच्या शरीराला त्याची सवय होईल.
- नाचणीपासून बनवलेले पदार्थ: हे लक्षात घेण्यासारखे आहे की, नाचणीपासून विविध चवदार आणि आरोग्यदायी पदार्थ बनवता येतात, जसे चपाती, पराठा, इडली आणि ढोकळा. याशिवाय नाचणीचा हलवा, खीर, खिचडीही बनवायला सोपी आहे. तुम्ही नाचणीचे पीठ मफिन्स, पॅनकेक्स, कुकीज आणि इतर बेकिंग रेसिपीमध्ये देखील वापरू शकता. नाचणी सलाड, सूप किंवा दही मिसळूनही खाता येते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)