Herbal Tea Controls Blood Pressure: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहारामुळे अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. हा आजार चोर पाऊलांनी आपल्या शरीरात प्रवेश करतो. एवढेच नाही तर त्या सोबत अनेक आजारांचा शिरकाव शरीरात होतो. उच्च रक्तदाबाच्या एकूण रूग्णांपैकी बहुतांश रूग्ण मधुमेह ग्रस्त असतात. यामुळे हृदविकार, पक्षाघात, मुत्रपिंडासंबंधित आजार, युरिक अॅसिडची समस्या देखील उद्भवू शकते. इतकेच नाही तर उच्च रक्तदाबामुळे दृष्टी देखील जाऊ शकते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची नितांत गरज आहे. परंतु महागडे औषधं किंवा आहारात मीठाचं प्रमाण कमी जरी केलं, तरी ही समस्या बरी होत नाही. पंरतु काही हर्बल टी प्यायल्यास रक्तदाबाची समस्या नियंत्रित करू शकता, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
हिबिस्कस चहा : हिबिस्कसच्या फुलांपासून बनवलेला चहा प्यायल्यानं रक्तदाब कमी होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 2010 मध्ये जर्नल ऑफ ह्यूमन हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हिबिस्कस चहा रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो. हिबिस्कस सबडारिफा अर्क उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींचे रक्तदाब कमी करते, असा निकष काढण्यात आलाय. मेक्सिकन संशोधक ए. हेरेरा-अरेलानो यांनी हा अभ्यास केला होता. त्यात असं आढळून आलं की, हिबिस्कस चहाचे गुणधर्म रक्तवाहिन्या विस्तृत करतात आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतं. तसंच यात अॅंथोसायनिन्स आणि प्लेव्होनॉइड्स ही संयुगे असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यात उपयुक्त आहेत. चहा करण्यासाठी हिबिस्कसच्या काही पाकळ्या पाण्यात उकळवा आणि गाळून त्याला चहासारखं घ्या.
तुळशीचा चहा :आयुर्वेदात तुळशीला एक उत्कृष्ट औषधी वनस्पती मानलं जातं. तुळशीचा चहा प्यायल्यानं अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. विशेषतः उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तुळशीचा चहा फायदेशीर आहे.
बडीशेप चहा:बडीशेप पाण्यात उकळून चहा तयार केला जातो. या चहामधील अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
कॅमोमाइल टी:वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम आहे. यात असलेले दाहक विरोधी गुणधर्म रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.
आल्याचा चहा:उच्चरक्दाबाच्या रुग्णांसाठी आल्याचा चहा गुणकारी आहे. यात अनेक औषधी गुणधर्म असल्याचे तज्ज्ञ सांगतात. आल्याचे तुकडे पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्यावं, असं सांगितलं जाते. आल्याचा चहा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.