पुणे : चीनमध्येह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस(HMPV) संसर्ग वेगानं वाढल्यानंतर भारतात देखील याचे रुग्ण दिसून येत आहेत. देशात सर्वप्रथम बंगळुरूमध्ये दोन मुलांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचं निदान झालं. त्यानंतर हळूहळू याचे रुग्ण वाढत असून आता राज्यातदेखील या व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याचं बोललं जात आहे.
अवघड नाव असलेला हा विषाणू खूप सौम्य असल्याची माहिती महाराष्ट्राचे माजी साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलीय. तसंच भारतात मागच्या वर्षी या संसर्गाचे 172 रुग्ण विविध प्रयोगशाळांनी शोधले होते. विशेष बाब म्हणजे यात कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.
डॉ. प्रदीप आवटे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) नेमकं काय म्हणाले डॉ. प्रदीप आवटे? :"ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बाबत चीनमधून काही बातम्या येताना दिसत आहे. मात्र, मेटाकुटीला जाऊन विचार करावा एवढा महत्त्वाचा हा व्हायरस नाही. हा व्हायरस नवीन नसून अगदी जुना व्हायरस आहे. वीस ते पंचवीस वर्षांपासून वैद्यकीय जगताला माहित असलेला हा विषाणू आहे. तसंच भारतात मागच्या वर्षी डिसेंबर पर्यंत आपल्याकडं याचे 172 रुग्ण विविध प्रयोगशाळांनी शोधले होते. त्यातील कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. हा व्हायरस अत्यंत सौम्य प्रकारचा असून यात सर्दी, खोकला होत असतो", असं आवटे म्हणाले.
घरगुती उपचाराने आजार होईल बरा :पुढं ते म्हणाले की, "HMPV व्हायरससारखे अनेक विषाणू आपल्याकडं आहे. हिवाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला जे सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढतं त्याच्यासाठी जे जबाबदार विषाणू असतात त्याच गटातील हा एक विषाणू आहे. त्यामुळं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र, इम्युनिटी कमी असललेल्या व्यक्तींमध्ये क्वचित प्रमाणात हा विषाणू गंभीर ठरू शकतो. पण या विषाणूमुळं घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. कोणीही घाबरून जाऊ नये. विशेष म्हणजे यासाठी औषधाचीदेखील गरज नाही. घरगुती उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो."
कशी घ्यावी काळजी? :"या आजरासाठी कुठलीही लस नाही. त्यामुळं हात वारंवार धुणे, तसंच सर्दी खोकला असल्यास मास्क लावून बाहेर जाणे, जनसंपर्क कमी करणे, नाकाला वारंवार हात न लावणे, चांगला आहार घेणे, पुरेशी झोप घेणे अश्या साध्या गोष्टी कराव्यात", असं डॉ. आवटे यांनी सांगितलं. तसंच जी खबरदारी आपण सर्दी खोकला झाल्यावर घेतो, तीच खबरदारी यात घ्यायची असल्याचंही ते म्हणालेत.
हेही वाचा -
- महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव? नागपूरमधील दोन संशयित रुग्ण आजारातून ठणठणीत बरे!
- देशात एचएमपीव्हीचे पाच रुग्ण, शास्त्रज्ञ स्वामीनाथन सौम्या यांनी दिला 'हा' सल्ला
- HMPV म्हणजे काय? चिंता करु नका, आरोग्य विभागाच्या 'या' सूचनांचं पालन करा