मुंबई :महान तबलावादक अल्ला राखा यांचा मोठा मुलगा उस्ताद झाकीर हुसैननं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतात आणि जगभरात नाव कमावले आहे. दरम्यान झाकीर हुसैन यांचं हृदयाशी संबंधित आजारामुळे निधन झाल्याचं समजत आहे. त्यांना काही दिवसापूर्वी त्याच्या तब्येतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचे सॅन फ्रान्सिस्को, यूएसए येथे रविवारी उपचारादरम्यान निधन झालं. गेल्या 2 आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचे वय 73 वर्षांचे होते. झाकीर हुसैन यांच्या निधनाच्या बातमीला यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. आता त्याच्या मृत्यूमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. दरम्यान चित्रपटसृष्टीतील स्टार्सनं देखील त्यांना आता पोस्टच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे. झाकीर हुसैन हे जगातील महान तबला वादकांपैकी एक होते. झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर सोनू निगम ते अमिताभ बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट :अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, "टी 5224 - ..एक दु:खद दिवस.' यानंतर त्यांनी त्याच्या ब्लॉगमध्ये झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली देत लिहिलं, 'एक प्रतिभाशाली, एक उत्तम उस्ताद, एक मोठ नुकसान, झाकीर हुसैन आपल्याला सोडून गेले.'
सोनू निगम :गायक सोनू निगमनं आपल्या इंस्टाग्राम पेजवर पोस्टमध्ये लिहिलं, 'झाकीर भाई हे काय आहे.' यानंतर त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'रेस्ट इन पीस उस्ताद' लिहिलं. आता सोनूच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन झाकीर हुसेन यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करत आहेत.
अनुप जलोटा यांची पोस्ट :भजन सम्राट अनूप जलोटा यांनी व्हिडिओ शेअर करून उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुप जलोटा यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं की, "संगीत जगताचे मोठे नुकसान, उस्ताद झाकीर हुसैन आता राहिले नाहीत. दोन तासांपूर्वी मला कळले की, त्यांची तब्येत खराब झाली असून अवस्था गंभीर आहे. त्यांच्या जाण्यानं मला खूप दुःख झालंय. संपूर्ण जगाला देखील वाईट वाटत आहे. ते देशाचे अभिमान आहे, तसेच तबल्याचा उल्लेख जेव्हाही होतो, तेव्हा भारताला त्यांच्या नावाने ओळखले जाते. मी प्रार्थना करतो, की त्यांना ईश्वर चरणी स्थान मिळावं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या दुःखाशी लढण्याची शक्ती मिळावी."