मुंबई :2024 वर्ष संपण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. यावर्षी भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक मोठे चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले होते. यापैकी काही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डही तोडले आणि जबरदस्त कमाई देखील केली. याशिवाय यावर्षातील खास चित्रपटांमधील दमदार कॅमिओ हा प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटामधील काही कॅमिओ मोठ्या पडद्यावर आल्यावर प्रेक्षकांना देखील आश्चर्य वाटलं होतं. चला तर मग वर्षाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतच्या चित्रपटांमधील दमदार कॅमिओवर एक नजर टाकूया.
'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3'चा कॅमिओ :यंदाची दिवाळी चित्रपट रसिकांसाठी धमाकेदार ठरली. यावर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दोन मोठे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले होते. यात कार्तिक आर्यन स्टारर हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 3' आणि दुसरा रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' होता. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 'भूल भुलैया 3'मध्ये शाहरुख खान कॅमिओ भूमिकेत दिसला होता, तर अजय देवगणच्या कॉप युनिव्हर्स 'सिंघम अगेन'मध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं कॅमिओ करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं होतं. रोहित शेट्टीच्या चित्रपटात सलमान 'चुलबुल सिंघम'च्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटाच्या शेवटी सलमानचा कॅमिओ वापरण्यात आला होता.
'स्त्री 2' कॅमिओ : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार यांच्या हॉरर कॉमेडी 'स्त्री 2'मध्ये तमन्ना भाटिया आणि अक्षय कुमार कॅमिओ भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील अक्षय कुमारचा कॅमिओ पाहून प्रेक्षक चकित झाले होते. 'स्त्री 2' चित्रपटातील खिलाडी कुमारची एन्ट्री एखाद्या आश्चर्यकारक कॅमिओपेक्षा कमी नव्हती. याशिवाय तमन्नाची देखील एन्ट्रीमुळे प्रेक्षक खुश झाले होते.