मुंबई - भारतामध्ये लोकप्रियतेच्या कळसावर असलेल्या अभिनेत्याला सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. राजेश खन्ना यांना भारताचा पहिला सुपरस्टार मानलं जातं. त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या कालावधीत अनेक सुपरस्टार म्हणून कलाकार ओळखले जाऊ लागले. राजेश खन्नानंतर अमिताभ बच्चन ते सलमान, आमिर, शाहरुख यांच्यासह अनेक कलाकारांच्या मागं ही उपाधी लावली जाते. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही ही यादी मोठी आहे. साऊथमध्ये रजनीकांत, कमल हासन यांचं नाव या यादीत सामील होत असतानाच मामूटी, मोहनलाल यांच्यापासून ते आजच्या काळातील धनुष आणि थलपती विजय यांनाही सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत चिरंजीवीपासून ते रामचरण, प्रभास, अल्लू अर्जून आणि ज्युनियर एनटीआरचीही वर्णीही या यादीत लागते. खोलवर विचार करायला गेलं तर तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषिक चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार सुपरस्टार्स म्हणून ओळखले जातात. परंतु या यादीमध्ये संपूर्ण भारतात एकच अभिनेत्री 'लेडी सुपरस्टार' म्हणून ओळखली जाते आणि तिचं नाव आहे नयनतारा! नयनतारा ही या सर्वोच्च स्थानापर्यंत कशी पोहोचली याच्या अनेक रंजक गोष्टी आहेत.
'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' हा शो नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. यामध्ये नयनताराचा एक अभिनेत्री म्हणून सुरू झालेला प्रवास 'लेडी सुपरस्टार' पदापर्यंत कसा पोहोचला याचा मनोरंजक खुलासा यातून पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम 18 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. याची एक झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ''लेडी सुपरस्टारची राजवट सुरू होत आहे'', असं शीर्षक देऊन 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' या कार्यक्रमाची ही झलक शेअर करण्यात आली आहे.