मुंबई :अभिनेता विकी कौशल आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा बहुप्रतीक्षित ऐतिहासिक काळातील चित्रपट 'छावा' हा 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. या चित्रपटात विकी कौशलनं छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदान्नानं त्यांची पत्नी महाराणी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. रश्मिकाला महाराणी येसूबाईची भूमिका साकारताना खूप अभिमानास्पद वाटलं आहे. तिनं याबद्दल म्हटलं होतं, "ही भूमिका साकारल्यानंतर मी आनंदानं रिटायरमेंट घेऊ शकते, कारण त्या एक महान आणि धाडसी व्यक्तिमत्व होत्या. त्यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे." आम्ही आज महाराणी येसूबाई कोण होत्या आणि त्यांनी आपल्या पतीच्या मृत्यूनंतर राजनैतिक समजुतीनं मुघल आणि इंग्रजांना कसं पराभूत केलं याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
राणी येसूबाई कोण होत्या? : महाराणी येसूबाई साहेब या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या. येसूबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा सरदार पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या होत्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर राणी येसूबाईंची कूटनीती ही कौतुकास्पद होती. महाराणी येसूबाई साहेब एक कर्तव्यदक्ष आणि राजकीयदृष्ट्या कुशल महिला होत्या.
शिवाजी महाराजांचा विश्वास जिंकला : येसूबाई यांनी राजनैतिक समजुतीनं आणि दृढ निश्चयामुळे लवकरच त्यांचे सासरे शिवाजी महाराजांचा विश्वास जिंकला होता. त्यांचे पती छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या कारकिर्दीत (1681-1689) मुघल सम्राट औरंगजेबानं 6 लाखांहून अधिक सैन्यासह मराठा साम्राज्यावर आक्रमण केलं होतं. त्यांना संपूर्ण दक्षिण भारत जिंकायचा होता. या काळातही येसूबाईंनी छत्रपती संभाजींना शासन आणि सैनिक योजनांबाबत खूप महत्त्वाचा सल्ला दिला होता. दरम्यान येसूबाई यांना पती जिवंत असतानाही काही दिवस विधवा म्हणून राहावं लागलं होतं. आग्रा सोडल्यानंतर शिवछत्रपतींनी लहान संभाजी यांना लपवले, यानंतर राजकुमार संभाजी राजे मरण पावल्याची अफवा पसरवली. संभाजी महाराज सुरक्षितपणे आपल्या राज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून राहावं लागलं होतं.