मुंबई -अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्यानं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. 'छावा' चित्रपटामध्ये त्यानं जबरदस्त अभिनय केला आहे, त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ विकी कौशल 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्याला भेट देणार असल्याचं सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ विकीनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. 19 फेब्रुवारी रोजी देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच स्वराज्याची राजधानी रायगड येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत.
विकी कौशल शिवजयंतीनिमित्त जाईल रायगड किल्ल्यावर :आता बॉलिवूड अभिनेता विकी कौशल देखील छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडलाल जात आहे. शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्याला भेट देऊन विकी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेणार आहे. तसेच शिवभक्तांसह अनेक मान्यवर येथे शिवजयंतीनिमित्त या कार्यक्रमात सामील होणार आहेत. यावर्षी बॉलिवूड अभिनेता विकी कौशल देखील छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडला जात असल्यानं त्याचे चाहते आता खुश झाले आहेत. आजचा दिवस शिवभक्तांसाठी खूप विशेष आहे. तसेच आज या विशेष दिवशी ढोल-ताशांच्या गजरात रायगडवर मिरवणुका काढली जाणार आहे.