मुंबई The Great Indian Kapil Show : कॉमेडी किंग कपिल शर्माचा नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' प्रेक्षकांना खूप आवडला आहे. कपिलचा शो जगभरात लोकप्रिय होत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार येऊन धमाल करतात. आत्तापर्यंत या शोचे 4 एपिसोड प्रदर्शित झाले आहेत. शनिवारी प्रदर्शित झालेला एपिसोड हा खूप धमाकेदार होता. दरम्यान चौथ्या एपिसोडमध्ये कौशल ब्रदर्सनं धमाल केली. या एपिसोडमध्ये दोन्ही भावांनी त्याच्याविषयी अनेक रंजक गोष्टींचा खुलासा केला. कपिलच्या शोमध्ये विकी कौशलची एक विचित्र सवयही समोर आली आहे. सनी कौशलनं या शोमध्ये त्याच्या लहानपणीच्या विचित्र सवयीचा खुलासा केला.
विकी कौशलच्या विचित्र सवयीचा झाला खुलासा :कपिल शर्मानं सनी कौशलला विचारलं की, "विकी कौशलची अशी काही विचित्र गोष्ट आहे का?" यानंतर त्यानं सांगितलं, "प्रत्येकाला झोपेत बोलायची सवय असते, पण विकी हा झोपेत बोलत पण होता आणि अभिनय देखील करत असे. कधी कधी तर मी कंफ्यूज होत होतो की हा खरच जागा आहे की झोपला आहे." यानंतर त्यानं पुढं सांगितलं, "एक दिवस मी झोपण्यासाठी जात होतो. विकी माझ्या 35-40 मिनिटे आधी झोपला होता. मी गेलो तेव्हा तो झोपेत बोलत होता. आम्ही दोघेही एकाच रुममध्ये झोपत होतो. यानंतर तो अचानक जागा झाला आणि ब्लँकेट काढले, यानंतर तो म्हणाला चेक कर... मला आश्चर्य वाटलं काय झालं. मग तो म्हणाला, माझा पेपर पूर्ण झाला आहे, हा चेक करा."