मुंबई - Veer Zaara history Box office : अभिनेता शाहरुख खान आणि प्रिती झिंटा स्टारर 20 वर्षे जुना रोमँटिक ड्रामा चित्रपट 'वीर जारा' सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. हा दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट नव्यानं रुपेरी पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला.आता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. चित्रपटसृष्टीतली नामांकित निर्मिती संस्था यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला 'वीर जारा' 2004 साली प्रदर्शित झाला होता. तब्बल वीस वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू कायम आहे. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा व्यवसाय केल्यामुळे हे सिद्ध झालं आहे. 'वीर जारा' मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये राहण्याऱ्या तरुण-तरुणीची संघर्षमय कहाणी मांडण्यात आली आहे.
'वीर जारा'नं रचला इतिहास : 'वीर जारा' हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खूप आवडतो. या चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. यश चोप्रा दिग्दर्शित या म्युझिकल हिटच्या पुनःप्रत्ययाचा आनंद चित्रपटरसिक घेत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातल्या गाण्यांना दिवंगत संगीत दिग्दर्शक मदनमोहन यांनी संगीतसाज चढवला होता. मदनमोहन यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या गाण्यांचा गोडवा रसिकांना 2004 साली पुन्हा अनुभवता आला होता. आता नव्याने प्रदर्शित झालेल्या 'वीर जारा'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. याआधी 'तुंबाड'नं रि-रिलीजद्वारे चांगली कामगिरी केली होती. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'वीर जारा' या चित्रपटाच्या रि-रिलीजचे कलेक्शन शेअर केले आहे. हा चित्रपट 203 थिएटरमध्ये सुरू आहे. या चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. नॅशनल सिनेमा डेच्या दिवशी हा चित्रपट 99 रुपयांमध्ये पाहायला मिळाला.