मुंबई - TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये रोशन सोधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षे या शोमध्ये काम करणाऱ्या जेनिफरनं निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर तिनं हा शो सोडला होता. जेनिफरनं असित कुमार मोदी, सोहिल रोमानी आणि जतिन रमानी यांच्याविरोधात पोलिसात केस दाखल केली होती. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या केसमध्ये जेनिफरचा विजय झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात शोचे निर्माते असित कुमार मोदी दोषी आढळले असून त्यांना जेनिफरला 25 लाख रुपयांची थकबाकी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जेनिफर मिस्त्री बंसीवालनं केली होती तक्रार दाखल : याशिवाय जेनिफरनं शोचे प्रोजेक्ट हेड सोहेल रोमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्यावर तिच्याबरोबर गैरवर्तन केल्याचा देखील आरोप केला होता. होळीच्या दिवशी हा प्रकार घडल्याचं जेनिफरनं सांगितले होतं. जेनिफरनं आरोप केला आहे की, होळीच्या दिवशी तिला सेटवरून जाऊ दिलं नाही. सेटवरून संपूर्ण स्टार कास्ट गेली यानंतर तिच्याबरोबर गैरवर्तन केलं गेलं. या आरोपांनंतर शोचे निर्माते असित मोदी यांनी म्हटलं होत की, ''जेनिफरचा तिच्या भूमिकेवर लक्ष देत नव्हती, तिची प्रॉडक्शनकडे तक्रार केली जात होती. तिनं शूटच्या शेवटच्या दिवशी खूप गैरवर्तन केलं होत.'' याशिवाय असित मोदी यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं.