मुंबई - भारताची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये दाखल झाली आणि तिनं आपली प्रतिभा सिद्ध करत त्या फिल्म इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग बनून गेली. गेल्या काही वर्षात ती ग्लोबल सेलेब्रिटी बनली आहे. आपला नाव लौकिक कमावल्यानंतर तिनं डिसेंबर 2018 मध्ये अमेरिकन संगीतकार निक जोनासशी लग्न करून तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनंतर या सेलिब्रिटी जोडप्याने 2022 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचं स्वागत केलं. त्यांनी या आपल्या लाडक्या लेकीचं मालती मेरी जोनास असं नामकरण केलं आहे. गेल्या काही वर्षांच्या आठवणीत रमलेल्या प्रियांकानं लेकी बरोबरचा एक फोटो तिच्या सोशल मीडिया हँडवर शेअर केला आहे.
असं म्हणतात की आपण आपल्या आनंदी जगण्यात व्यग्र झालेलो असतो तेव्हा या मजेच्या दिवसात काळ कसा भुर्रकन निघून जातो याचा पत्ताही लागत नाही. ग्लोबल स्टार प्रियांकाच्या बाबतीतही काहीसं असंच घडलंय. तिची मुलगी मालती मेरीने त्यांच्या आयुष्यात प्रवेश करून दोन वर्षे उलटून गेली यावर तिचा विश्वास बसत नाही. प्रियांकानं काही वेळापूर्वी सोशल मीडियावर आपल्या प्रिय मुलीचे दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अलीकडेच काढलेल्या पहिल्या सेल्फीमध्ये मालती प्रियांकाच्या मांडीवर आरामशीर बसलेली दिसत आहे. प्रियांकानं मऊ राखाडी कार्डिगन परिधान करून, मालतीला तिच्या उबदारपणाच्या मायेत गुंतवलं आहे. पांढऱ्या आणि गुलाबी पोशाखात सुंदर दिसणाऱ्या या चिमुकलीनं आपल्याला अवाक केलं आहे. दुसऱ्या एका फोटोत लहान मालतीने आपल्या चिमुकल्या हातानं आईच्या गालाला स्पर्श केल्याचं दिसतं.