मुंबई - The Great Indian Kapil Show : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हिरामंडी' या वेब सीरीजमधील संपूर्ण स्टार कास्ट 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी भागात दिसणार आहे. आज 8 मे रोजी नेटफ्लिक्स इंडियानं या शोमधील प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख दिसत आहेत. या प्रोमोमध्ये कपिल सोनाक्षीला तिच्या लग्नाबद्दल चिडवताना दिसत आहे. 'हिरामंडी'ची संपूर्ण कास्ट शोचा आनंद घेत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. आता या शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो' प्रोमो रिलीज :व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये कपिल सोनाक्षीला सांगतो की, आता आलिया भट्ट आणि कियारा अडवाणीचं लग्न झालं आहे. यावर ती म्हणते "तुम्ही जखमेवर मीठ चोळत आहात, मला लग्न करायचं आहे हे तुला माहीत आहे." सोनाक्षीच्या या वक्तव्यावर सगळेच हसतात. 'हिरामंडी'च्या शूटिंगबद्दल बोलताना रिचा चड्ढानं सवाल केला की सर्वात जास्त कोणी रिटेक घेतला यावर सोनाक्षीनं सांगितलं की, तिचे 12 पेक्षा जास्त रिटेक नाहीत. त्यानंतर रिचानं सांगितले की, तिचा जास्तीत जास्त 99 रिटेक करण्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय मनीषा कोईरालानं देखील सेटवरचा तिचा अनुभव कसा होता याबद्दल सांगत तिनं म्हटलं, "सेटवर प्रत्येक सीनपूर्वी नेहमी अस्वस्थतेची भावना असायची." यानंतर बाकी तिथे उपस्थित असलेली स्टार कास्ट सेटवरचे त्यांचे अनुभव सांगतात.