मुंबई Oscar 2025 : 2025 मध्ये होणाऱ्या जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं जाहीर केली आहे. हा कार्यक्रम कधी आणि कुठे होणार याबद्दलची बातमी आता समोर येत आहे. ऑस्कर सोहळा हा चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठित समारंभांपैकी एक आहे. प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीला आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार जिंकण्याची इच्छा असते. काल बुधवारी अकादमीनं 2025 साली होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नामांकनांच्या टाइमलाइनबद्दल माहिती शेअर केली.
97 व्या ऑस्कर सोहळ्याची तारीख जाहीर : अकादमीनं पोस्टवर लिहिलं, ''तुमच्या कॅलेंडरची तारीख मार्क करून घ्या, 97 वा ऑस्कर सोहळा रविवार, 2 मार्च 2025 रोजी होणार आहे.'' हा कार्यक्रम भारतात 3 मार्च रोजी प्रसारित होईल. वेळेबद्दल बोलायचं झाल्यास, ऑस्कर 2025चा सोहळा हा संध्याकाळी 7 वाजता इएसटी (EST) आणि एबीसी (ABC)वर पाहता येईल. नामांकनांची घोषणा शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी केली जाईल. आता ऑस्कर पुरस्कारबद्दलची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र पुरस्कारबद्दल धूम सुरू आहे. मागील 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी आश्चर्यकारक कामगिरी केली होती. यामुळे या चित्रपटांना अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.