छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं भव्य आयोजन शहरात केलं जाणार आहे.15 जानेवारी 19 जानेवारी दरम्यान प्रोझोन मॉल येथे हा महोत्सव होणार असून यंदाचे हे दहावे वर्ष असणार आहे. वेगवेगळ्या भाषांमधील जवळपास 65 चित्रपटांची मेजवानी अनुभवता येणार आहे. यावर्षीचं वैशिष्ठ म्हणजे यंदाचा पद्मपाणी म्हणजे जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध जिग्दर्शिका सई परांजपे यांना देण्यात येणार आहे. तर हिंदी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणारे अशितोष गोवारीकर पाच दिवस महोत्सवात असणार असून सांगता करण्यासाठी ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांची उपस्थिती लाभणार आहे. पाच दिवस वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट, लघुपट यांच्यासह वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद, तांत्रिक विषयावर माहिती देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतील, असा विश्वास आयोजन समितीचे सदस्य आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
पाच दिवस चालणार महोत्सव...
गेल्या नऊ वर्षांपासून शहरात अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जातो, यंदा या महोत्सवाचे हे दहावे वर्ष असून सोहळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यंदा पाच दिवसांचा हा महोत्सव असणार आहे. या पाच दिवसात रसिक प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांच्या कधीही न पाहिलेल्या पण अनेक वेळा चर्चेत आलेल्या वेगळ्या विषयांच्या आणि भाषेच्या 65 चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. याबाबत आयोजन समितीनं पत्रकार परिषद घेत कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली. आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट छत्रपती संभाजीनगरच्या रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांबरोबर संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
10 वा अजिंठा वेरूळ फिल्म फेस्टीव्हल (Etv Bharat)
कालिया मर्दन विशेष प्रदर्शन...
महोत्सवाच्या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्तानं आयोजन समितीच्या वतीनं मराठवाड्यातील रसिकांना एका विशेष कार्यक्रमाची भेट दिली जाणार आहे. भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिध्द मुकपट ‘कालिया मर्दन’ याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी संपन्न होणार आहे. शंभर वर्षांपूर्वीचे मुकपट सिनेगृहात प्रत्यक्ष संगीताद्वारे (लाईव्ह ऑर्केस्ट्रा) दाखविले जात. तोच अनुभव रसिकांना मिळावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील ‘सतब्दीर सब्द’ या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला जाणार आहे. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात बुधवारी, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सायं. ५ वा. या मुकपटाचं प्रदर्शन करण्यात येईल. कालिया मर्दन विशेष प्रदर्शन व उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांसाठी प्रवेश खुला असेल अस आयोजकांनी सांगितले.
पहिल्या दिवशी पद्मपाणी पुरस्कार होईल प्रदान
चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवारी, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची उपस्थिती असणार आहे. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी.रामाकृष्णन, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, प्रोझोनचे सेंटर डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ९ वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तामिळ भाषेतील फिल्म ‘लिटील जाफना’ फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे.
यांच्या साहाय्यानं होईल सोहळा
या महोत्सवासाठी अनेक संस्था प्रयत्नशील आहेत ज्यामधे नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं संपन्न होत आहे. प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला नेहमी असते. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. डेली हंट डिजीटल पार्टनर आहेत. सॉलीटेअर टॉवर्स हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे ॲकडमिक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम 90.8 हे रेडिओ पार्टनर आहेत.