महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सूरज चव्हाणसाठी कायपण, 'सैराट'च्या बाळ्यानं काढलं 'आग्या मोहोळ' !! - SURAJ CHAVAN AND TANAJI GALGUNDE

Marathi Bigg Boss Suraj Chavan : मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाण आणि सैराट फेम तानाजी गालगुंडे यांची 'राजा राणी' शूटिंग सेटवर मैत्री पाहायला मिळाली.

Marathi Bigg Boss Suraj Chavan
सूरज चव्हाण आणि तानाजी गालगुंडे (( Photo - Shivaji Doltade facebook screen grab ))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 21, 2024, 3:40 PM IST

Updated : Oct 21, 2024, 4:42 PM IST

मुंबई - सूरज चव्हाण 'मराठी बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याचा आगामी चित्रपट 'झापुक झुपूक' मराठीतील ख्यातनाम दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित करणार आहेत. यासाठी अलीकडेच त्यानं केदार शिंदे यांची भेट घेतली आणि चित्रपटाच्या पुढील योजनेची चर्चा केली. दरम्यान सूरजचा पहिला चित्रपट 'राजा राणी' 18 ऑक्टोबरला प्रजर्शित झाला. शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातून सूरज चव्हाणनं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

'राजा राणी' या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाज दोलताडे यांच्यासह सैराट फेम तानाजी गालगुंडे आणि सूरज चव्हाण यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये तानाजी गालगुंडे आणि सूरज चव्हाण यांची ऑफ कॅमेरा केमेस्ट्री पाहायला मिळते. दोघंही ग्रामीण पार्श्वभूमी असलेले हे होतकरु कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत. 'सैराट'मुळे कोणीही नसलेल्या तानाजीला 'बाळ्या'च्या भूमिकेत नागराज मंजुळेंनी कास्ट केलं आणि या संधीचं त्यानं सोनं केलं होतं. त्याप्रमाणेच शिवाजी दोलताडे यांनी सूरज चव्हाणला 'राजा राणी' चित्रपटात कास्ट केलंय. हा चित्रपट महाराष्ट्रभर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'राजा राणी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तानाजी गालगुंडे आणि सूरज चव्हाण यांनी भरपूर धमाल मस्ती केल्याचं दिसत आहे. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी आपल्या फेसबुकवर यातील काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यातील एका व्हिडिओत तानाजी आणि सूरज जंगलातील एका झाडीमध्ये शिरुन मधाचं मोहोळ काढताना दिसतात. तानाजी निर्भयपणे मोहोळ शोधताना दिसतो तर हातामध्ये धूरी धरुन सूरज त्याला साथ देताना दिसतोय. हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

'राजा राणी' चित्रपटाच्या मेकिंगचे आणखी काही व्हिडिओ शिवाजी दोलताडे यांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यामध्ये सूरज बिग बॉसच्या ट्रॉफीसह सामील झाल्याचाही एक व्हिडिओ आहे. दरम्यान सूरज चव्हाणनं नुकतीच केदार शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी शिंदे यांनी अतिशय प्रेमानं त्याचं स्वागत केलं आणि सत्कारही केला. यावेळी शिंदे यांनी सूरजला भेटवस्तुही दिल्याचं त्यांचा इन्स्टाग्राम व्हिडिओत दिसत आहे.

Last Updated : Oct 21, 2024, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details