मुंबई - मालिकाविश्वात पहिल्यांदाच महिला संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित 'सखा माझा पांडुरंग' ही टीव्ही मालिका 'सन मराठी' वाहिनीवर दाखवली जाणार आहे. येत्या १० मार्चपासून 'सखा माझा पांडुरंग' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेत सखूबाईंची बालपणातील भूमिका बालकलाकार स्वराली खोमणे साकारणार आहे तर पांडुरंगाच्या भूमिकेत तेजस महाजन पाहायला मिळणार आहे. याबरोबरच नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांची मनंअभिनेता सुनील तावडे नरोत्तम यांची भूमिका साकारणार आहेत.
या भूमिकेबद्दल बोलताना सुनील तावडे म्हणाले की, "'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत मी नरोत्तम ही खलनायकाची भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत खलनायकाची किंवा पौराणिक भूमिका मी साकारलेली आहे पण नरोत्तम ही भूमिका साकारायला छान वाटतं आहे. या भूमिकेची वेशभूषा, ऐट, आविर्भाव खूप वेगळा आहे. आतापर्यंत मी अशी भूमिका केली नव्हती म्हणून नरोत्तम यांची भूमिका मला आव्हानात्मक वाटते. अत्यंत क्रूर खलनायक साकारताना दुसऱ्यांचा कितपत छळ करता येईल हा एकच विचार या भूमिकेचा आहे. संत सखूबाई यांना तो प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या भूमिकेच्या माध्यमातून मला अभिनयाची एक वेगळी छटा दाखवता येत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी गावाकडचा सेट दाखवला आहे म्हणून शूटिंग करताना सुद्धा प्रसन्न वाटतंय."