मुंबई - Sarkata in Bigg Boss 18 :'बिग बॉस 18' हा शो लॉन्च होण्यापूर्वीच चर्चेत आहे. यावेळी निर्माते कोणाला घरात प्रवेश देणार यावर प्रेक्षक आणि चाहते अंदाज लावत आहेत. दरम्यान, या शोबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 'स्त्री 2' मधील 'सरकटा'ची भूमिका साकारणारा सुनील कुमार यात झळकणार आहे. 'बिग बॉस 18'चा प्रीमियर 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. 'स्त्री 2' मधील 'सरकटा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम सुनीलला मिळालं आहे. सुनीलला 'बिग बॉस 18'साठी अप्रोच केल्याची पुष्टी आता झाली आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत.
'बिग बॉस 18'मध्ये 'सरकटा'ची होणार एंट्री : सुनील कुमार हा जम्मूमधील पोलीस अधिकारी आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या 'स्त्री 2'मधील 'सरकटा'ची भूमिका अनेकांना आवडली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत सुनीलनं पुष्टी केली की, सलमान खानच्या शोच्या आगामी सीझनसाठी त्याला संपर्क करण्यात आला होता. याविषयी बोलताना त्यानं म्हटलं, "मला नुकताच 'बिग बॉस'चा कॉल आला आहे. ऑक्टोबरमध्ये 'बिग बॉस' शोसाठी बोलवत आहे. सध्या मी 'बिग बॉस'ला वेळ देत आहे, कारण मी पोलीस खात्यामध्ये काम करतो. मला सुट्टी मिळण्यात फारशी अडचण येत नाही. आमचे पोलीस क्रीडा अधिकारी मला पाठिंबा देत असले तरी मला रजेसाठी विनंती करावी लागेल. जर मला चित्रपटासाठी, जाहिरातीसाठी आणि कुस्तीसाठी कुठेही जायचे असेल तर ते मला पाठिंबा देत असून कधीही सुट्टी देतात."