मुंबई - Anant Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्न समारंभाला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी बॉलिवूडपासून दक्षिणेतील सिनेसृष्टीतील फिल्म स्टार्सना आमंत्रित केलं होतं. यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, शाहरुख खान, सलमान खान, राम चरण आणि सूर्यासारखे स्टार्स पहिल्यांदाच एका छताखाली एकत्र दिसले. यावेळी अनंत आणि राधिका यांनी मंडपात बसून प्रत्येक जन्मी एकत्र येण्याची शपथ घेतली. यावेळी
पाहुण्यांच्या गर्दीत बसलेला शाहरुख खान उभा राहिला आणि किंग खाननं भारतीय परंपरा जपत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अनंत आणि राधिकाच्या लग्न प्रसंगी शाहरुखच्या समोर रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता आल्या असताना तो त्यांना हात जोडून भेटला आणि त्यांचे स्वागत केलं. यानंतर शाहरुख खानने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांना हाय-हॅलो म्हटलं. अखेर शतकातील सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे शाहरुख खानसमोर दिसले, तेव्हा शाहरुख खानने दोघांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
शाहरुख खानचा मोठ्यांप्रती असलेला आदर पाहून किंग खानच्या चाहत्यांचा ऊर अभिमानानं भरुन आला. त्यांनी आपले विचार प्रतिक्रियांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. "शाहरुख भारतीय परंपरांना जागला", असं एकानं लिहिलंय. "एकच हृदय आहे, ते किती वेळा चोरशील", असं एकानं शाहरुखला प्रेमानं म्हटलंय.