मुंबई :'स्क्विड गेम'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वेब सीरीजच्या तिसरा सीझनची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सनं खुलासा केला आहे की, ली जंग-जेचा कोरियन ड्रामा हा लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 30 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सनं एक्स अकाउंटवर शेवटच्या सीझनची रिलीज तारीख जाहीर झाली आहे. या पोस्टवर त्यांनी लिहिलं, 'स्क्विड गेम'च्या शेवटच्या सीझनसाठी तुम्हाला कोणीच तयार करू शकत नाही. सीझन 3चा प्रीमियर 27 जून रोजी होणार आहे.' याशिवाय 'स्क्विड गेम 3'मधील काही पात्रांची पोस्टर देखील शेअर करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'अंतिम सामन्यासाठी सज्ज व्हा. 27 जून रोजी प्रीमियर होणाऱ्या 'स्क्विड गेम सीझन 3'चा फर्स्ट लूक येथे पाहा.'
'स्क्विड गेम सीझन 3'चे पोस्टर :दरम्यान शेअर फोटोंमध्ये ली जंग-जेच्या हातांना बांधलेलं दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या एका फोटोमध्ये एक पिंक गार्ड दिसत आहे. तसेच तिसऱ्या फोटोमध्ये पार्क सुंग-हून हा शवपेटीसमोर गुडघे टेकून काही लोकांबरोबर असल्याचा दिसत आहे. शेवटच्या फोटोमध्ये फ्रंट मॅन आहे. 'स्क्विड गेम सीझन 3'च्या रिलीजसाठी अनेकजण आतुर आहेत. हा शो खूप लोकप्रिय बनला आहे. तसेच काही दिवसापूर्वी 'स्क्विड गेम 3'ची रिलीज तारीख लीक झाली होती. याशिवाय अतिंम सीझनचे पहिले पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले होते.