मुंबई - गायक अरिजीत सिंगची गणना इंडस्ट्रीतील सर्वोत्तम गायकांमध्ये केली जाते. त्यानं आपल्या आवाजची जादू संपूर्ण जगात केली आहे. आतापर्यंत अरिजीतनं अनेक हिट गाणी चित्रपटसृष्टीत गायली आहेत. गाण्यांव्यतिरिक्त, अरिजीत त्याच्या साधेपणासाठी देखील प्रसिद्ध आहे. दरम्यान अरिजीतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ लाईव्ह कॉन्सर्टदरम्यानचा आहे. अनेकदा कॉन्सर्टमध्ये अरिजीत असे काही करतो, जे चर्चेचा विषय बनतो. आता यावेळी देखील असंच काही घडलं आहे. व्हायरल व्हिडिओत कॉन्सर्टमध्ये गायकाला त्याच्या वडिलांचा फोन येतो, ज्याला तो अशा पद्धतीनं उत्तर देतो की, त्याचे चाहते देखील कौतुक करत आहेत.
कॉन्सर्टदरम्यान अरिजीतला आला वडिलांचा कॉल : कॉन्सर्टदरम्यान अरिजीतला त्याच्या वडिलांचा व्हिडिओ कॉल आल्यानंतर तो परफॉर्मन्स थांबवत नाही, याशिवाय तो फोनही कट करत नाही. तो फोन घेतो आणि त्याच्या वडिलांशी बोलतो. अरिजीत क्षणभर त्याच्या वडिलांकडे प्रेमानं पाहतो. यानंतर, तो आपला फोन फिरवतो आणि प्रेक्षकांना स्क्रीन दाखवतो आणि म्हणतो, 'हा बाबांचा फोन आहे.' तसेच प्रेक्षक देखील अरिजीतवर प्रेमाचा वर्षाव करतात. मोबाईल स्क्रीनवर वडिलांकडे पाहत, अरिजीत 'लापता लेडीज'मधील 'ओ सजनी रे' हे गाणे पूर्ण भावनेनं गातो. आता अरिजीतचे हावभाव त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. कॉन्सर्टमध्ये गात असताना देखील त्यानं आपल्या वडिलांकडे दुर्लक्ष केलं नाही.