मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून त्यानं डेब्यू करून चाहत्यांची मनं जिंकली होती. सिद्धार्थनं बॉलिवूडमधील अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलंय. गेल्या काही वर्षांत त्यानं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. आज 16 जानेवारी रोजी, सिद्धार्थ आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज या विशेष प्रसंगी सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीच्या प्रेमकहाणीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते, पण 'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीची प्रेमकहणी: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची पहिली भेट 2018 मध्ये एका पार्टीत झाली होती. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' या शोमध्ये कियारानं सांगितलं होतं की, दोघांची पहिली भेट 'लस्ट स्टोरीज'च्या रॅप अप पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. 'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगनंतर, हे जोडपे वारंवार एकत्र दिसू लागले होते. याशिवाय अनेकदा दोघेही पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. तसेच 'शेरशाह'च्या प्रमोशनदरम्यान, दोघांमधील केमिस्ट्री खूप अप्रतिम असल्याची दिसली. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा या समोर येऊ लागल्या. 2022मध्ये नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सिद्धार्थ आणि कियारा एकत्र आले. यावेळी दोघेही मालदीवमध्ये एकत्र होते.