मुंबई - 'पुष्पा 2 द रुल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चौफेर घोडदौड करतानाच्या बातम्या सर्वच माध्यमातून झळकल्या आहेत. अवघ्या दोन दिवसात सिनेमानं जगभरात तब्बल 400 कोटींचा गल्ला जमा केला आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'पुष्पा 2' हा पहिला भारतीय चित्रपट बनलाय. हिंदी भाषेतही या चित्रपटाला मोठं यश मिळालं आहे. सर्वाधिक कमाईचे आकडे तेलुगू प्रांत असलेल्या तेलंगणा आणि आंध्रातून असले तरी तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील या चित्रपटाच्या व्हर्जनला उत्तम यश मिळत आहे. या चित्रपटाच्या यशात जितका वाटा दिग्दर्शक आणि कलाकारांचा आहे तितकाच डब करण्यासाठी आवाज देणाऱ्या कलाकारांचाही आहे. हिंदीतील पुष्पाचे दमदार डायलॉग बॉलिवूडचा मराठमोळा स्टार श्रेयस तळपदे याच्या आजावाजात आहेत.
श्रेयस तळपदेनं तोंडात कापूस दाबून पकडला अल्लू अर्जूनच्या आवाजाचा टोन
श्रेयस तळपदेनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो अल्लू अर्जुनला अजून भेटलेला नाही. गोलमाल सारख्या हिट फ्रँचायझींमध्ये काम केलेला अभिनेता श्रेयस तळपदे यानं 'पुष्पा 2' मध्ये डब केलेल्या अल्लू अर्जुनला हिंदीत आवाज देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. श्रेयस तळपदेनं डबिंग दरम्यान 2 तासात 14 सत्रे केली आणि अल्लू अर्जुनचा आवाज तोंडात कापूस दाबून पकडला. अल्लू अर्जुनला जेव्हा पहिल्यांदा 'पुष्पा द राइज'बद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यानं श्रेयसच्या टॅलेंटची खूप प्रशंसा केली होती.