मुंबई - व्हॅलेंटाईन वीकच्या पार्श्वभूमीवर अनेक रोमँटिक प्रेमकथा असलेले चित्रपट रिलीज होत आलेत. मात्र यंदाच्या वर्षी एका नऊ वर्षे जुना असलेल्या 'सनम तेरी कसम' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर गर्दा अडवून दिला आहे. हा चित्रपट पुनर्प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ब्लॉकबस्टर झाला आहे आणि तो देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक बनला आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांच्या भूमिका असलेला हा रोमँटिक चित्रपट व्हॅलेंटाईन प्री-वीकेंडमध्ये सर्वात आघाडीवर आहे. या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या 'लवयापा' आणि 'बदमाश रविकुमार' या नवीन चित्रपटांनाही हा चित्रपट जोरदार टक्कर देत आहे. इतकंच नाही तर, तिकीट बुकिंगच्या बाबतीतही या चित्रपटानं रणबीर कपूर-दीपिका पदुकोण यांच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटालाही मागं टाकलं आहे.
हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन स्टारर 'सनम तेरी कसम' हा चित्रपट 2016 मध्ये पहिल्यांदा रिलीज झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फार चालला नव्हता. सुरुवातीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ९ कोटी रुपयांची कमाई केली होती. पण जेव्हा यावर्षी ७ फेब्रुवारी रोजी चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रमोशन नसतानाही आश्चर्यचकित करणारी कमाई केली आहे.
'सनम तेरी कसम'चं रिलीजच्या तिसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन - 'सनम तेरी कसम' चित्रपटानं री-रिलीजच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला. निर्मात्यांच्या मते, पहिल्या दिवशी या चित्रपटानं तब्बल ५.१४ कोटी रुपयांची कमाई केली. ही री-रिलीज चित्रपटाची सर्वाधिक कमाई मानली जाते. यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ दिसून आली. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं ६.२२ कोटींची कमाई केली.