मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या जीवाला सध्या मोठा धोका आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनं सलमानला जीवे मारण्याची शपथ घेतली आहे. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोई टोळीनं सलमान आणि शाहरुख खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता सलमान खानला आणखी एक नवी आणि लेटेस्ट धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांपर्यंत एक नवीन धमकीचा संदेश पोहोचला आहे. या धमकीमध्ये 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
सलमान खानला मिळाली नवीन धमकी :मिळालेल्या धमकीमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यात 5 कोटी रुपयांसाठी समेट होणार असल्याचं सांगण्यात आलंय. नव्या धमकीमध्ये लिहिलंय, 'ही धमकी हलक्यात घेऊ नका, सलमान खानला जिवंत रहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईबरोबर भांडण मिटवायचं आहे, तर 5 कोटी रुपये पाठवा. पैसे न पाठवल्यास सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल.' सलमान खानला नवी धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. आता अनेक चाहते देखील सलमानची चिंता करताना दिसत आहेत.