मुंबई :बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना धक्का बसला होता. एक चोर चोरी करण्याच्या उद्देशानं त्याच्या घरात घुसला होता. जेव्हा सैफनं त्याला पकडले, तेव्हा त्या चोरानं त्याच्यावर चाकूनं 6 वेळा हल्ला केला होता. यानंतर सैफला खूप रक्तस्त्राव झाला. त्याला रात्री लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेनंतर पोलीस आरोपींच्या शोधात होती. अखेर पोलिसांचा शोध संपला आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासेही होत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी 5 मोठे खुलासे केले आहेत.
1. आरोपीचे बांग्लादेशशी संबंध : पोलिसांनी आरोपीची ओळख मोहम्मद शरीफुल शहजाद असल्याची सांगितली आहे. त्याला सैफच्या घरापासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या हिरानंदानी इस्टेटजवळ अटक करण्यात आली. पोलिसांच्या मते, त्याच्याकडे कोणतेही भारतीय कागदपत्रे नाहीत. हा हल्लेखोर बांग्लादेशी आहे. त्याच्याकडील जप्त केलेल्या काही कागदपत्रांवरून तो बांग्लादेशी असल्याचं सिद्ध होत आहे.
2 . हल्लेखोरानं त्याच्या नावात केला बदल : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद शरीफुल शहजादनं आपलं नाव बदलून विजय दास असं ठेवलं होतं. याशिवाय, त्यानं स्वतःसाठी इतर नावे देखील वापरली होती.
3 . हल्लेखोर मुंबईत कधी आला? : हल्लेखोर मोहम्मद शरीफुल शहजाद सुमारे 5-6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. तो अनेकदा भारतात येत होता. हल्ल्याच्या फक्त 15 दिवस आधी तो मुंबईत परतला होता.
4. आरोपी येथे करायचा काम : मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ठाण्यातील एका पबमध्ये काम करत होता. मुंबई पोलिसांनुसार, सैफ अली खानवरील हल्ल्यापूर्वी आरोपी एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता.
5 . गुन्हेगारी रेकॉर्ड कसा आहे? : मोहम्मद शरीफुल शहजादवर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. सुरुवातीच्या तपासात याबद्दल माहित झालं आहे. आरोपी अजूनही पोलीस कोठडीत असून याप्रकरणी चौकशी केली जात आहे. याशिवाय आरोपीनं आपला गुन्हाही कबूल केला आहे. पोलिसांनी या आरोपीचा शोध मोबाईल लोकेशनवरून काढला. लवकरच पोलीस या आरोपीला न्यायालयात हजर करतील. तसेच पोलिसांना सैफच्या घरात काम करणाऱ्या लोकांवरही संशय आहे, कारण इतक्या कडक सुरक्षेनंतरही हा हल्ला झाला जो धक्कादायक होता. या घटनेत कोण कोण सामील आहे, हल्लेखोर किती काळापासून गुन्ह्याची योजना आखत होता आणि त्याचा हेतू काय होता हे आता पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा :
- सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय, कारण काय?
- सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, वेटर म्हणून केलं होतं काम
- अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयित छत्तीसगडमध्ये ताब्यात, मुंबई पोलीस घेणार ताबा