जामनगर (गुजरात) - Anant Radhika pre wedding : पहिल्यांदाच भारत भेटीवर आलेल्या पॉप क्वीन रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य विवाहपूर्व सोहळ्यात पहिल्याच दिवशी आपल्या नेत्रदीप परफॉर्मन्सने उपस्थितांना भारावून सोडलं. व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये, रिहाना फ्लोरोसेंट ग्रीन बॉडीकॉन आणि चकचकीत गाऊन परिधान केलेली दिसत आहे. स्टेजवर परफॉर्म करताना तिने कार्यक्रमातील पाहुण्यांशी संवादही साधला.
रिहानाने तिच्या 'वर्क' या लोकप्रिय ट्रॅकवरही परफॉर्मन्स सादर केला. तिने 'रुड बॉय', 'पॉर इट अप', 'डायमंड्स' आणि 'वाइल्ड थिंग्ज' यासह तिच्या स्रव हिट गाण्यांवर प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. तिनं या सोहळ्यासाठी आंत्रीत केल्याबद्दल अंबानी कुटुंबाचे आभार मानले आणि अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या जोडप्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.
पॉप सेन्सेशन रिहानाच्या परफॉर्मन्सपासून ते एका खास ड्रोन शोपर्यंत, अंबानींचा तीन दिवसांचा प्री-वेडिंग फेस्टिव्हल एक भव्य कार्यक्रम असणार आहे. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातील पाहुणे जामनगर, गुजरात येथे दाखल झाले आहेत.
शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते एमएस धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांसारख्या प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्त्वांपर्यंत विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज सेलेब्रिटी या तीन दिवसांच्या भव्य सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत.
पहिल्या दिवशीचा कार्यक्रम संध्याकाळी 5.30 वाजता 'एन इव्हनिंग इन एव्हरलँड अॅट द कंझर्व्हेटरी' ने सुरू झाला. यामध्ये पाहुण्यांसाठी ड्रेस कोड म्हणून 'एलिगंट कॉकटेल'ची स्टाईल करण्यात आली होती. त्यानंतर अंबानी कुटुंबियांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.