मुंबई Raveena Tandon : अलीकडंच एका व्यक्तीनं सोशल मीडियावर रवीना टंडनचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत रवीनानं मद्यधुंद अवस्थेत एका वृद्ध महिलेला कारनं धडक दिल्याचा दावा मोहम्मद ऊर्फ मोहसीन नावाच्या व्यक्तीन केला होता. यानंतर मोहसीननं शेअर केलेल्या व्हिडिओत रवीनानं मारहाण केल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुंबई पोलिसांना रवीनावर केलेले आरोप खोटे असल्याचं आढळून आलं. आता रवीनानं व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला नोटीस बजावली. तिनं कथित रोड रेज घटनेबाबत पोस्ट केलेला व्हिडिओ न हटवल्याबद्दल मानहानीची नोटीस पाठवली. तर संबंधित व्यक्तीनंही रवीनाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अली काशीफ खान या वकिलांच्या माध्यमातून रवीना टंडनविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रवीना टंडनवर खोटा आरोप :रवीना टंडनवरील आरोप खोटे असल्याचं पोलीस तपास आणि सीसीटीव्हीवरुन स्पष्ट झालं. रवीना टंडनच्या वतीनं व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला व्हिडिओ काढून टाकण्यास सांगण्यात आलं. मात्र, त्या व्यक्तीनं व्हिडिओ काढण्यास नकार दिला. त्यानंतर तिनं त्या व्यक्तीला मानहानीची नोटीस पाठवली. याआधी रवीनावर गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. रवीना टंडनची वकील सना खान यांनी सांगितलं, की "अलीकडंच रवीना टंडनला खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. रवीना टंडनवरील आरोप खोटे असल्याचं पोलीस तपासात आणि सीसीटीव्हीवरुन स्पष्ट झालं. रवीना टंडनच्या वतीनं व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला तो व्हिडिओ काढून टाकण्यास सांगण्यात आलं. मात्र, त्या व्यक्तीनं व्हिडिओ काढण्यास नकार दिला, यानंतर त्या व्यक्तीला मानहानीची नोटीस पाठवली गेली आहे."