मुंबई : समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या एका भागात पालकांबद्दल युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहबादियानं केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा व्यापक निषेध होत आहे. या प्रकरणात आसाम पोलिसांनी रणवीर अलाहबादियाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगानं (NCW)सोशल मीडिया स्ट्रीमिंग साइट्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील सामग्रीवर अंकुश लावण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सांगितलं की, "ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका शो दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल पोलिसांनी युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे."
रणवीर अलाहाबादिया विरुद्ध आसाममध्ये तक्रार दाखल : रणवीर अलाहाबादियासह, इतर चार सोशल मीडिया इन्फ्लुएंसरविरुद्धही तक्रार दाखल केली गेली आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी पुढं म्हटलं, "आज 10 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी पोलिसांनी आशिष चंचलानी 2. जसप्रीत सिंग 3. अपूर्वा मखीजा 4 रणवीर अलाहबादिया 5. समय रैना आणि इतर काही इंफ्लूएंसरविरोधात एफआयआर दाखल केली. 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा आणि चर्चा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी तपास अजूनही सुरू आहे." युट्यूबर-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहबादियानं समय रैनाच्या शोमध्ये पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या केल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.