मुंबई - Ranbir Kapoor And Alia Bhatt : अभिनेता रणबीर कपूरनं 28 जानेवारी रोजी झालेल्या 69व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात खूप धमाल केली आहे. या सोहळ्यात रणबीर कपूरनं सहाव्यांदा फिल्मफेअर अवॉर्ड जिंकला आहे. त्यानं फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जबरदस्त परफॉर्म केला. या अवॉर्ड शोमध्ये रणबीर कपूर पूर्ण फॉर्ममध्ये दिसला. दरम्यान सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या सोहळ्यात रणबीर हा 'ॲनिमल' चित्रपटातील 500 किलोची बंदूक घेऊन स्टेजवर पोहोचला होता. याशिवाय त्यानं या कार्यक्रमात 'जमाल कुडू' गाण्यावर पत्नी अलिया भट्टसोबत डान्सही केला आहे.
रणबीर कपूरची 500 किलोची बंदूक : 69व्या फिल्मफेअर अवॉर्डची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीर कपूरचे दोन व्हिडिओ हे त्याच्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहेत. एका व्हिडिओमध्ये रणबीर कपूरनं 'ॲनिमल' चित्रपटातील 500 किलो वजनाची बंदुक ही स्टेजवर आणली आणि ती चालवताना त्यानं खूप एन्जॉय केलं. 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या मंचावरून आणखी एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये'ॲनिमल' चित्रपटातील एंट्री गाणं 'जमाल कुडू'वर रणबीर आणि आलिया डान्स करत बॉबी देओलप्रमाणे डोक्यावर ग्लास ठेवताना दिसत आहे.