महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कोल्हापूरच्या पाटलांचा नादच खुळा; 'कलापूर'मधून अभिनय सुरू करणाऱ्या 'शोमन' राज कपूरचा उभारला पुतळा - RAJ KAPOOR STATUE IN KOLHAPUR

दिवंगत फिल्ममेकर, अभिनेते राज कपूर यांचं हे जन्मशताब्दी आहे. कोल्हापुरातील त्यांच्या एका चाहत्यानं त्यांचा पुतळा उभारला आहे. हा पुतळा कोल्हापूरकरांच्या त्यांच्यावरील निस्सीम प्रेमाची साक्ष देतो.

RAJ KAPOOR STATUE IN KOLHAPUR
संपादित छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2024, 2:30 PM IST

Updated : Dec 14, 2024, 10:45 PM IST

कोल्हापूर : 'कलापूर' अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात मुलखावेगळी माणसं होऊन गेली. इथल्या माणसांचं प्रेमसुद्धा अचंबित करायला लावणारं असंच आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील 'दि ग्रेटेस्ट शो मन' अशी ओळख असलेले राज कपूर पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आले ते हेच गाव. कलेची अखंड आराधना करणाऱ्या राज कपूर यांचे जगाच्या पाठीवर अनेक चाहते असतील, मात्र कोल्हापुरातील एका चाहत्यानं राज कपूर यांच्या प्रेमापोटी कोल्हापुरात त्यांचा पुतळाच उभा केला. हा भाग्यवान कलावंत आणि त्याचा 'दर्दी' चाहता आज दोघंही या जगात नाहीत. मात्र राज कपूरवरच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देत कोल्हापूरच्या जुना वाशी नाका परिसरात आजही हा पुतळा दिमाखात उभा आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास कपूर घराण्याशिवाय अपूर्ण :भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास कपूर घराण्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूर यांच्यापासून ते आजच्या पिढीतील करीना कपूर, करिष्मा कपूर, रणबीर कपूर यांनी आपापल्या काळात अनेक सुपरहिट सिनेमे देऊन चाहत्यांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झाले. मूळचं आताच्या पाकिस्तानातील पेशावर इथलं हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. याचवेळी चित्रपट निर्मितीत पदार्पण केलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्या अनेक सिनेमाचं चित्रीकरण कोल्हापुरात व्हायचं. यामुळे कपूर घराण्याचा आणि कोल्हापूरचा 40 च्या दशकापासून ऋणानुबंध जोडला गेला. 'वाल्मिकी' चित्रपटात नारदमुनींच्या भूमिकेसाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत असलेल्या चुणचुणीत, कोवळ्या पोराला हेरलं आणि राज कपूर यांच्या चेहऱ्याला पहिल्यांदा कोल्हापुरात रंगाचा साज चढवला गेला. याच चित्रपटाच्या मानधनातून मिळालेल्या 5 हजार रुपयांतून मुंबईतील चेंबूरच्या स्टुडिओची जागा खरेदी करण्यात आली. हाच आर के स्टुडिओ अनेक ऐतिहासिक चित्रपटांचा निर्माता ठरला.

कोल्हापुरातील राज कपूर यांच्या पुतळ्याची गोष्ट (ईटीव्ही भारत बातमीदार)

कोल्हापुरातील संभाजी पाटील यांनी उभारला पुतळा : नीलकमल, चोरी चोरी, आवारा, श्री 420, आह, अंदाज, दास्तान, मेरा नाम जोकर अशा अनेक चित्रपटांतील राज कपूर सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यातीलच राज कपूर यांचे चाहते असणारे आणि कोल्हापूर महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे संभाजी पाटील हे राज कपूर यांचे निस्सीम भक्त. राज कपूर यांचा कोणताही चित्रपट 'फर्स्ट डे फर्स्ट शो' अनुभवण्याची अनिवार इच्छा संभाजी पाटील कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे. राज कपूर यांचा जगावेगळा चाहता कोल्हापुरात होता. 1988 या वर्षी राज कपूर यांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा हातउसने पैसे घेऊन कोल्हापूर ते मुंबई असा दुचाकीचा प्रवास करत त्यांच्या अंत्यविधीला संभाजी पाटील उपस्थित राहिले. त्यानंतर राज कपूर यांची पुण्यतिथी संभाजी पाटील वडिलांच्या श्राद्धाप्रमाणे यथासांग करत. या प्रेमापोटी पुतळा उभा करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि लोकवर्गणीतून, महापालिकेच्या सहकार्यानं त्यांनी प्रयत्न केले. त्यातून कोल्हापूरच्या जुना वाशी नाका परिसरात 50 हजारांची लोकवर्गणी जमा करून खास खांद्यावर काठी असलेला कपूर स्टाईलचा पुतळा कोल्हापुरातील कलाकार प्रतापसिंह जाधव यांनी ब्राँझ धातूपासून साकारला. 4 जानेवारी 1995 रोजी राज कपूर यांचे बंधू शशी कपूर यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण झालं. विशेष म्हणजे चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणाऱ्या आर के स्टुडिओबाहेर कधी काळी असलेल्या राज कपूर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती वाटावी, असा हा पुतळा आहे. देशाचं सांस्कृतिक वैभव असलेल्या आर के स्टुडिओची जागा आता कमर्शियल वास्तूने घेतली आहे. आर के स्टुडिओ किमान बाहेरुन पाहिलेल्या प्रत्येकाला 'शोमन'चा हा पुतळा नकळत भूतकाळात घेऊन जातो. मात्र हा पुतळा कालांतरानं संभाजी पाटील यांचंही निधन झालं. मात्र पाटील यांच्या घराजवळच अभिनेता आणि चाहता यांच्या प्रेमाची साक्ष देणारा रुबाबदार राज कपूर यांचा पुतळा आजही दिमाखात उभा आहे.

अभिनेते राज कपूर यांचा पुतळा (Reporter)

पाटील कुटुंबाकडून रोज होते स्वच्छता :दिवंगत संभाजी पाटील यांच्या घराच्या आवारातच रस्त्याकडेला हा पुतळा उभा आहे. संभाजी पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र प्रतीक पाटील आणि पाटील कुटुंबातील सदस्य दररोज या पुतळ्याची स्वच्छता करतात. वडिलांनी राज कपूर यांच्या प्रेमापोटी उभा केलेला हा पुतळा कलानगरी कोल्हापुरात कलाकार आणि चाहता यांचं प्रेम अधोरेखित करणारा आहे. रस्त्यावरून येणारे जाणारे अनेक कोल्हापूरकर या ठिकाणी थांबून आश्चर्यानं या पुतळ्याकडं पाहतात. जयंती पुण्यतिथी निमित्त पाटील कुटुंबाकडून या ठिकाणी विविध कार्यक्रमही घेतले जातात.

एकूण राज कपूर यांनी त्यांच्या महत्वाकांक्षी 'मेरा नाम जोकर' चित्रपटात मुकेश यांच्या आवाजात आर्ततेने आळवलेल्या 'रहेंगे यहीं अपने निशान, इसके सिवा जाना कहां' ची सार्थता हा पुतळा राज कपूर यांच्या निधनाच्या 36 वर्षांनंतरही पटवून देतो, हे मान्य करायलाच हवं.

हेही वाचा :

  1. 'शोमॅन' राज कपूर यांचे कुटुंब एका फ्रेममध्ये कैद, 100 व्या जयंती सोहळ्याला दिग्गज सेलेब्रिटींची हजेरी
  2. राज कपूर यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त धर्मेंद्र यांनी शेअर केला थ्रोबॅक फोटो
  3. राज कपूर यांचे कुटुंबिय त्यांची 100वी जयंती करणार खास पद्धतीनं साजरी, पंतप्रधान मोदी यांना केलं आमंत्रित...
Last Updated : Dec 14, 2024, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details