मुंबई - साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'पुष्पा 2 द रुल' सध्या बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालत आहे. 'पुष्पा 2' नं केवळ दोन आठवड्यात 1500 कोटींचा व्यवसाय करून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'पुष्पा 2' तेलगू भाषेत कमी आणि हिंदी पट्ट्यात जास्त कमाई करत आहे. दरम्यान, उत्तर भारतातील थिएटर्समधून हा चित्रपट उतरवण्यात आला होता.
'पुष्पा 2' ला दाक्षिणात्य भाषातून जितका प्रतिसाद मिळाला त्याहून कितीतरी पटीनं हिंदी भाषिक राज्यातूनही मिळाला. असा प्रतिसाद मिळवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं हिंदीमध्ये 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर मग उत्तर भारतातील थिएटर्समधून सिनेमा का काढवा लागला होता, हे जाणून घेऊयात.
उत्तर भारतात 'पुष्पा 2' का थांबला?
मीडियात आलेल्या बातम्यांनुसार, अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्यांचा पीव्हीआर आयनॉक्सशी वाद झाला होता. त्यानंतर या थिएटर चेननं संपूर्ण उत्तर भारतातून चित्रपट काढून टाकण्याचा निर्णय घेतला. चित्रपट व्यवसायातील एका विश्लेषकानं सांगितलं की, 'पुष्पा 2' काल रात्री उत्तर भारतातील सर्व पीव्हीआर, आयनॉक्स थिएटर्समधून काढून टाकण्यात आला. यानंतर 'पुष्पा 2' च्या चाहत्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.