मुंबई - Priyanka Chopra : गेली कित्येक शतके स्त्रियांना समानतेची वागणूक आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक जण कार्यरत आहेत. अर्थात त्यात स्त्रियांची संख्या अधिक आहे. परंतु महिलांच्या लैंगिक समस्यांवर फार कमी बोलले गेले आहे. तसेच त्यांच्यावरील लैंगिक छळाबद्दल कोणीही बोलताना दिसत नसे. किंबहुना आधीच्या काळात त्याविषयी बोलणेदेखील पाप समजले जाई. परंतु भारतीय समाजानेसुद्धा कात टाकली असून या विषयावर चर्चा होताना दिसतात, खासकरून शहरी भागात. प्रियांका चोप्रा जोनास हिने आपली निर्मितीसंस्था पर्पल पेबल्स पिक्चर्स मार्फत 'वुमन ऑफ माय बिलियन' अर्थात 'WOMB' या डॉक्युमेंटरीची निर्मिती केली असून ती एका महिलेच्या भारतभर केलेल्या प्रवासाची कहाणी असून त्यातून महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत या हिंसेला सामोरे गेलेल्या महिलांना भेटण्यासाठी एका महिलेच्या प्रवासाची सत्यकथा सांगणारा हा माहितीपट असून त्याला प्रियांका चोप्राने पाठिंबा दर्शविला आहे. अजितेश शर्मा यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.
"महिलांवर होत आलेले लैंगिक अत्याचार, भेदभाव आणि मुस्कटदाबी याविरुद्ध संघर्ष नाही तर त्यापलीकडे घेऊन जाणारा हा माहितीपट आहे. यात वेदना आणि दुःख यांचा सहानुभूतीपर वापर न करता स्त्रियांचे सामाजिक उत्थान कसे होईल आणि जागतिक स्तरावर त्यांना सन्मान कसा मिळेल यावर भाष्य करण्यात आलेले आहे", अशा भावना प्रियांका चोप्रा जोनास हिने व्यक्त केल्या.