मुंबई Dani Li Death : मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पॉप गायिकेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही गायिका ब्राझीलची पॉप स्टार डॅनी ली असून तिनं वयाच्या 42 व्या वर्षी जगातून निरोप घेतला आहे. डॅनी लीवर नुकतीच लिपोसक्शन सर्जरी झाली होती. ही एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये शरीराच्या काही भागांमधून अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते. या शस्त्रक्रियाद्वारे लठ्ठपणा कमी करून स्लिम लूक दिला जातो. डॅनी ली लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्यासाठी काही दिवासापूर्वी गेली होती. तिनं तिच्या शरीरावर लिपोसक्शन शस्त्रक्रिया केली. यानंतर तिला काही समस्या येऊ लागल्या.
डॅनी लीचं झालं निधन : शरीरावर केलेल्या या शस्त्रक्रियामुळे तिला तिचा जीव गमवावा लागला. सध्या पोलीस डॅनीच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. डॅनी ली विवाहित असून तिला 7 वर्षांची मुलगी देखील आहे. अशा आकस्मिक निधनानं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॅनी लीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबाने इंस्टाग्रामवर एका निवेदनाद्वारे शोक व्यक्त केला. दरम्यान, डॅनी लीला श्रद्धांजली वाहण्यासाठी एका समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. आता अनेक चाहते आणि सेलिब्रिटी तिला सोशल मीडियाच्या माध्यातून श्रद्धांजली वाहत आहेत.