मुंबई : यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया आता चर्चेत आला आहे. अलीकडेच समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंटमध्ये तो दिसला होता. या शोमध्ये दिसल्यानंतर तो अडचणीत सापडला आहे. 31 वर्षीय रणवीरनं शोमधील एका स्पर्धकाला असा प्रश्न विचारला की, सगळेच थक्क झाले. रणवीरनं या स्पर्धकाला पालकांबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील पद्धतीनं प्रश्न विचारला. या प्रश्नानंतर अनेक लोक रणवीरवर कारवाईची मागणी करत आहेत. रणवीर अलाहबादिया त्याच्या पॉडकास्टिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. दरम्यान 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रणवीर अलाहबादियाचं अश्लील विधान चर्चेत : रणवीरच्या या टिप्पणीवर लेखक आणि गीतकार नीलेश मिश्रा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी युट्यूबरचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, 'आपल्या देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या विचित्र निर्मात्यांना भेटा. मला खात्री आहे की, त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. आजच्या काळात कंटेंटचा दर्जा घसरला आहे. निर्मात्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्ममध्ये कोणतीही भावना नाही. निर्माते म्हणून ते काहीही बोलू शकतात.' दरम्यान सोशल मीडियावर देखील रणवीरला अनेकजण ट्रोल करत आहेत. आता हा व्हिडिओ अनेकजण त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत तो कसा व्यक्ती आहे, याबद्दल सांगत आहेत.
रणवीरवर तक्रार झाली दाखल :कारवाईची मागणी करणाऱ्या एका यूजरनं लिहिलं की, 'रणवीर अलाहबादियाला तुरुंगात टाकावे. इंडियाज गॉट टॅलेंटवर बंदी घालावी. सरकारनं त्वरित कारवाई करावी. रणवीर अलाहबादिया, तुमची टिप्पणी खूपच असभ्य आहे. डार्क कॉमेडीच्या नावाखाली तुम्ही लोक कौटुंबिक मूल्यांची हत्या करत आहात.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'त्यांच्या आईनं तिच्या मुलांच्या तोंडून असं घृणास्पद बोलणं ऐकलं असतं तर तिला कसं वाटलं असतं?' आणखी एकानं लिहिलं, 'कुल बनण्यासाठी गेला आणि फुल झाला.' याशिवाय अनेकजण त्याला खडेबोल सुनवताना दिसत आहेत. अशा अनेक वापरकर्त्यांनी रणवीरच्या कमेंटवर टीका केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर रणवीर अलाहबादियाकडून अद्याप कोणतेही विधान आलेलं नाही. याशिवाय 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या निर्मात्यांनी या वादावर कोणतेही सार्वजनिक विधान जारी केलं नाही. तसेच युट्यूबर रणवीर अलाहबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा, विनोदी कलाकार समय रैना आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. शोमध्ये अपशब्द वापरल्याबद्दल मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. आता याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी अनेकजण करत आहेत.
रणवीर अलाहबादियानं मागितली माफी : 'इंडियाज गॉट टॅलेंट' शोवरचं हे प्रकरण सोशल मीडियावर तापत असल्यानं रणवीर अलाहबादियानं आता माफी मागितली आहे. याशिवाय याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.